येत्या रविवारी होणार लोणी मॅरेथॉन २०२६
पारगाव, ता. २३ : लोणी (ता. आंबेगाव) येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी यांच्या वतीने लोणी मॅरेथॉन २०२६ ही स्पर्धा येत्या रविवारी (ता. ४) आयोजित करण्यात आली आहे. तीन, पाच, दहा आणि एकवीस किलोमीटर या विविध गटांमध्ये ही स्पर्धा होणार असल्याची माहिती प्रबोधिनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून देशभरातील स्पर्धक यामध्ये सहभागी होत असतात. मागील वर्षी साडेतीन हजाराहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेडल आणि टी-शर्ट देण्यात येईल. मॅरेथॉनची वेळ सकाळी साडेसहा वाजता असून श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशाला येथे आयोजन करण्यात येणार आहे. नवनीत शिनलकर, अरुण साकोरे, राहुल पडवळ या सदस्यांकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयराजे वाळुंज व डॉ. कैलास गायकवाड यांनी केले आहे.

