टाव्हरेवाडीतील संकरित कालवडींची कृषिकमध्ये बाजी
पारगाव, ता. ६ : टाव्हरेवाडी (ता. आंबेगाव) येथील गणेश किसन टाव्हरे व योगेश किसन टाव्हरे या बंधूंच्या गोठ्यातील संकरित गाईंच्या कालवडी राज्यात अव्वल ठरत आहेत. बारामती येथे झालेल्या कृषिक २०२६ प्रदर्शनात होलस्टीन फ्रिजियन कालवड स्पर्धेत एका कालवडीने दुसरा, तर एकीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या या दोन्ही भावांनी जिद्द चिकाटी मेहनत, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दररोज सरासरी ४५० ते ५०० लिटर दुधाचे उत्पादन घेऊन एखाद्या आयटी इंजिनिअरच्या पगाराएवढे उत्पन्न मिळवत आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गणेश टाव्हरे यांचे आठवीपर्यंत, तर योगेश टाव्हरे यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. घरची फक्त दोन एकर शेती असल्यामुळे या दोन्ही भावांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. पाच वर्षापासून वडिलोपार्जित दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत सुरुवात केली. त्यांच्या गोठ्यात दुधाळ गायी व कालवडी मिळून एकूण ७० गायी आहे. त्यांच्या गोठ्यात दररोज एकूण सरासरी सुमारे ५०० लिटर दूध उत्पादन होत आहे. सध्या दुधाला प्रतिलिटर ३८ ते ४० रुपये बाजारभाव मिळत आहे. महिन्याला पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. खर्चवजा जाता महिन्याला अडीच ते तीन लाखाचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे. त्यांनी कालवडींवर उच्च प्रतीच्या वळू, तसेच गायीपासून तयार केलेला सात दिवसांचा भ्रूण म्हणजे भ्रूण प्रत्यारोपणाचा (टेस्ट ट्यूब बेबी) प्रयोग केला आहे. त्याद्वारे उच्च प्रतीच्या कालवडी तयार झाल्या आहेत. बारामती येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषिक प्रदर्शनात टाव्हरे यांच्या गोठ्यातील होलस्टीन फ्रिजियन जातीच्या एका कालवडीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या कालवडीला रोख २१ हजार व स्मृती चिन्ह बक्षीस मिळाले आहे. दुसऱ्या कालवडीने तृतीय क्रमांक मिळवीत रोख ११ हजार रुपये व स्मृती चिन्ह बक्षीस मिळविले आहे.
सौंदर्य स्पर्धेतही बाजी
या दोन्ही कालवडींना प्रत्येकी तीन लाखांची मागणी झाली आहे. गणेश टाव्हरे व त्यांच्या पत्नी रूपाली, तसेच योगेश टाव्हरे त्यांच्या पत्नी स्वाती व आई साळूबाई टाव्हरे हे सर्वजण गोठ्याचे व्यवस्थापन पाहत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संगमनेर येथे झालेल्या कळस कृषी व डेअरी प्रदर्शनात गायींच्या राज्यस्तरीय दुग्ध व सौंदर्य स्पर्धेत त्यांच्या दोन कालवडींनी दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला होता. त्यावेळी दोन्ही कालवडीला प्रत्येकी रोख ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता.
06573
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

