
वाळू, मुरूम अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा
आपटाळे, ता. १० ः जुन्नर तालुक्यात वाळू, माती, मुरूम यासारख्या गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. जुन्नर तहसील कार्यालय येथे नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील विविध महसूल व प्रशासकीय कामकाजांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार रवींद्र सबनीस, निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे, निवडणूक नायब तहसीलदार सुधीर वाघमारे, शांताराम किर्वे, शोभा भालेकर, विद्या नांगरे, व्यंकटेश भोसले यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व तालुकास्तरीय विभागांनी तातडीने कामे सुरू करावी. शेतकऱ्यांच्या पोटखराबा क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्रात रूपांतरित करण्याची प्रकरणे तसेच 42 ड ची प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी यावेळी केल्या. या प्रसंगी डॉ. देशमुख यांनी तहसील कार्यालय, रेकॉर्ड रूम, गोडाऊन आदींची पाहणी केली.