मी सुशिक्षित गाढव आहे म्हणून येथे कचरा टाकतो

मी सुशिक्षित गाढव आहे म्हणून येथे कचरा टाकतो

आपटाळे, ता. ३ : स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध पातळीवर काम केले जाते. जुन्नर शहराच्या सीमेवर वसलेल्या पाडळी बारव (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांनी स्वच्छता राखण्यासाठी फ्लेक्सच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. त्यावर ‘मी सुशिक्षित गाढव आहे म्हणून येथे कचरा टाकतो.’ अशा आशयाचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याची गावात चर्चा होत आहे.
शहाण्याला शब्दाचा मार या म्हणी प्रमाणे गावात स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीने लावलेल्या या फ्लेक्सची चर्चा सर्वत्र होत आहे. तर जाता येता नागरिक थांबून बारकाईने फ्लेक्सवरील मजकूर वाचताना दिसत आहेत. पाडळी बारव ग्रामपंचायतीच्या हद्दीत जनजागृतीसाठी फ्लेक्सच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीने फ्लेक्सबाजी करण्यापेक्षा स्वच्छता करून सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पाडळी हा ग्रामीण शेती प्रधान वस्तीचा भाग आहे तर बारव ही वेगाने विकसित होणारी शहरी धाटणीची वस्ती आहे. बारव भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय, निमशासकीय नोकरदार, शिक्षक, व्यावसायिक यांचे वास्तव्य आहे. बारव येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे घनकचऱ्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बऱ्याचदा नागरिक मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच बारवमध्ये असणाऱ्या ओढ्यांच्या परिसरात कचरा टाकत असल्याचे निदर्शनास येते. परिणामी परिसराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत आहे. त्यासोबतच कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न देखील उद्भवत आहे.
ग्रामपंचायतच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी देखील फिरवली जात आहे. तसेच येथील नागरिकांना कचरा न करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या जातात मात्र नागरिकांकडून या सूचनांचे पालन केले जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने फ्लेक्स बोर्ड लावण्याची नामी शक्कल लढवली. ज्या ठिकाणी नागरिक कचरा टाकतात त्याच ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने फ्लेक्स लावले आहेत. फ्लेक्स बाजी केल्यानंतर त्यावरील मजकूर वाचल्यानंतर तरी रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबतील का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com