जेवणात अळी सापडल्याची चौकशी करण्याची मागणी
आपटाळे, ता. ९ : जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत जेवणामध्ये राजमाच्या भाजीमध्ये अळ्या सापडल्या असून, त्याबाबत खोटी माहिती देणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासनाने तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुकाळवेढे गावचे सरपंच व आदिवासी नेते दत्तात्रेय गवारी यांनी जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात गुरुवारपासून (ता. ९) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबतचे निवेदन गवारी यांनी जुन्नरच्या तहसीलदारांना दिले आहे. त्यात म्हटले आहे की, घोडेगाव प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांना मध्यवर्ती स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) कोटमदरा (ता. आंबेगाव) या ठिकाणाहून नाश्ता व जेवण पुरवठा केला जात आहे. मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरु झाल्यापासून जेवणाबाबत वारंवार विद्यार्थी तक्रारी करत आहेत. जेवणामध्ये अळ्या सापडल्याचे प्रकार घडले आहेत. ३० सप्टेंबर रोजी सोमतवाडी येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळेमध्ये दुपारच्या जेवणामध्ये राजमाच्या भाजीमध्ये अळ्या सापडल्या होत्या. विद्यार्थिनींनी ते जेवण घेण्यास नकार दिला. मात्र, जेवणामध्ये अळी नसून, तो राजमाच्या भाजीचा अंकुर असल्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. एवढा गंभीर प्रकार घडूनदेखील प्रकल्प अधिकाऱ्यांनी अद्याप आश्रमशाळेस भेट दिली नाही. सेंट्रल किचनद्वारे पुरवठा होत असलेल्या जेवणाची गुणवत्ता तपासावी व शासनाने या घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी.