बाजारभावाअभावी फूल उत्पादकांत नाराजी
आपटाळे, ता. २० : ऐन दिवाळीच्या सणासुदीला फुलांचे बाजारभाव समाधानकारक नसल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. फुलांची विक्री केल्यानंतर भांडवली खर्च वजा जाता हातात काहीच शिल्लक राहणार नसल्याने उत्पादकांची दिवाळी कशी निराशा जनक जात आहे.
जुन्नर तालुक्यातील कुसूर, वडज, निमदरी, सावरगाव या परिसरात मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन घेतले जाते. झेंडू, शेवंती या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने शेतकऱ्यांकडून या फुलांचे उत्पादन घेतले जाते. येथील फुले मुंबई येथील दादरसह अन्य फूल बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात. सध्या शेवंती फुलाला प्रतिकिलोस चाळीस ते शंभर रुपये तर झेंडू फुलाला चाळीस ते ऐंशी रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याचे शेतकरी महेंद्र भगत यांनी सांगितले.
शेवंती फुलांसाठी एकरी भांडवली खर्च दीड लाखाहून अधिक खर्च येतो तर झेंडूसाठी सत्तर हजारपर्यंत भांडवली खर्च येत आहे. शेवंतीची फुले चार महिन्यानंतर तर झेंडू दोन महिन्यानंतर काढणीस येतो. सध्याच्या बाजारभावामुळे भांडवली खर्च देखील सुटणार नसल्याने फूल उत्पादक शेतकरी ऐन दिवाळीत आर्थिक संकटात सापडला आहे.
02803