बिबट्याचा शिकारी मोड ‘ऑन’

Published on

मिननाथ पानसरे
आपटाळे, ता. १८ : जुन्नर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना पाहिल्यास बिबट्या प्रामुख्याने लहान शाळकरी मुले व वृद्ध नागरिक यांच्यावर हल्ले करण्याचे प्रमाण अधिक आहे. शाळकरी मुले अथवा वृद्ध नागरिक हे प्रतिकार करण्यास सक्षम नसल्याने बिबट्याच्या हल्ल्यात त्यांना जीव गमवावा लागत आहे. त्यातच बिबट्याचे वाढते हल्ले व राजरोसपणे होणारे दर्शन यामुळे पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुन्नर तालुक्यात केवळ ऊस उत्पादित क्षेत्रामध्येच बिबट्याचा प्रादुर्भाव आहे, असे नाही तर आदिवासी भागात जेथे उसाचे क्षेत्रच नाही, अशा भागात देखील बिबट्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. बिबट्याची संख्या नेमकी किती याचा अचूक आकडा वनविभागाला देखील सांगता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गाव व वाडी वस्ती येथे कधी बिबट्या दर्शन देईल, अथवा हल्ला करेल याचा अंदाज सांगणे कठीण झाले आहे. तालुक्यातील बहुतांशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांची वेळ सर्वसाधारणपणे सकाळी दहा ते पाच अशी आहे. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील बहुतांशी विद्यार्थी हे माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी जुन्नर शहरात दररोज येत असतात. शिक्षण घेण्यासाठी त्यांना एसटी बसने प्रवास करावा लागतो. अनेकदा बस वेळेवर न मिळाल्याने या विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी उशिराने घरी पोहोचावे लागते. त्यातच सध्या थंडी पडण्यास सुरुवात झाली असून सायंकाळी अंधार लवकर पडत आहे. अशा वेळी गावातील बसस्थानकापासून घरापर्यंत जाताना अंधार पडल्यास या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन घराकडे जावे लागते त्यातच काही विद्यार्थी हे शेतावर राहण्यास असल्याने अशा विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

सध्या तालुक्यात लहान मुलांवर बिबट्याचे हल्ले होत असल्याच्या घटना पाहता त्या अनुषंगाने सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालक व शिक्षक या दोन्ही घटकांनी जागरूक राहावे.
- अशोक लांडे, गटशिक्षणाधिकारी

वनविभागाच्या माध्यमातून शाळास्तरावर मानव बिबट संघर्षाबाबत वनपाल, वनरक्षक यांच्याद्वारे जनजागृतीपर मोहीम सुरू आहे. शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे. शालेय परिसर अथवा शाळेत जाण्याच्या मार्गावर बिबट्या निदर्शनास आल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.
- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर

या उपाययोजना आवश्‍यक
पालकांनी स्वतः विद्यार्थ्याला शाळेत नेऊन सोडावे व शाळा सुटल्यावर घेण्यास जावे
विद्यार्थी गैरहजर असल्यास शिक्षकांनी तत्काळ पालकांशी संपर्क साधावा
बिबट्या प्रवण क्षेत्रातील शाळांनी शालेय परिसरात विद्यार्थ्यांना एकट्याने सोडू नये
विद्यार्थ्यांना बिबट्या प्राण्यांविषयी शास्त्रीय माहिती द्यावी व सुरक्षेच्या उपाययोजना सांगाव्यात
विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना अथवा सुटल्यानंतर समूहाने घरी जावे
विद्यार्थ्यांनी दाट झाडी, झुडपे व अडचणीच्या ठिकाणी जाणे टाळावे
शाळांनी आपल्या शालेय परिसरात अडगळ, झाडेझुडपे राहणार नाही याची काळजी घ्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com