‘नीरा भीमा’ची सभा घाईगडबडीत गुंडाळली
बावडा, ता. २८ : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोणत्याही सभासद शेतकऱ्यास, संचालकास, आजी- माजी पदाधिकाऱ्यांना बोलू न देता एकतर्फी घाईगडबडीत गुंडाळण्यात आली, असा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी केला.
नीरा भीमा कारखान्याची सन २०२४-२५ ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २६) झाली. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील होत्या. या सभेबाबत पत्राद्वारे व सोशल मीडियाच्या माध्यमातून पंडितराव पाटील यांनी सभा घाईगडबडीत गुंडाळल्याचा आरोप केला.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, या सभेस उपस्थित असणाऱ्या सभासदांना, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कारखान्याची ऊस बिले, कारखान्यावर विविध बँका, संस्था व पतसंस्थांचे असणारे ३१० कोटी रुपयांचे कर्ज, दरवर्षी कर्जावर भरावे लागणारे २० कोटी रुपये व्याज, ऊस वजने आदी विषयावर बोलायचे होते, परंतु दरवर्षीपेक्षा यावर्षी वेगळे नियोजन करून कोणासही बोलायची संधी न देता अध्यक्ष भाग्यश्री पाटील व संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची भाषणे होऊन सभा सांगता केली. कारखाना सभासद महादेव घाडगे, पंडितराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सभा नोटिशीतील तरतुदीनुसार सहा प्रश्न लेखी विचारले होते. त्याची उत्तरे कार्यकारी संचालकांनी कोणासही समजणार नाहीत, अशा पद्धतीने ऐकू न येणाऱ्या कर्कश आवाजात दिली. शेतकरी संघर्ष समितीने साखर आयुक्तांकडे अहवाल देण्यासाठी तक्रार केल्यानंतर सर्व सभासदांना कारखाना अहवाल वाटप केले. सभेपूर्वी अहवाल हातात पडल्यामुळे सभासद प्रलंबित ऊस बिले व अन्य कळीच्या विषयावर प्रश्न विचारणार, या भितीपोटी सभेत कोणासही बोलू न देता सभा गुंडाळण्याची किमया केली. पंडितराव पाटील यांनी सनदशीरपणे बोलण्याची परवानगी मागितली, परंतु सभा अध्यक्षांनी नकार दिला. लोकशाही मूल्यांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सतत बोलणाऱ्या सहकारातील जाणकार नेतृत्वाने आत्मपरीक्षण करावे की आपले काय चुकले व काय बरोबर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.