बदलत्या ऊर्सची नवी ओळख

बदलत्या ऊर्सची नवी ओळख

Published on

बदलत्या ऊर्सची नवी ओळख
पुणे-मुंबई महामार्गाजवळील आणि पुणे शहरापासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर तसेच हवेली-मुळशी तालुक्यांच्या जवळ असलेल्या ऊर्से गावात नवनवीन गृहप्रकल्प उभे राहत असून, या गावाची शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल होत आहे. ऊर्सेचे ऐतिहासिक महत्त्व देखील मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येथील दोन मावळ्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते. आज हे गाव दळणवळणाच्या महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक म्हणून प्रसिद्ध होत आहे. येथील ऐतिहासिक तळे शिवकालीन काळातील असून, त्याचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. मंदिरासमोर वसलेले हे तळे पंचक्रोशीतीलच नव्हे तर तालुक्यातील एकमेव असे तळे मानले जाते. आज गावाचा ज्या पद्धतीने विकास होत आहे, तो पाहण्याजोगा आहे.
- संतोष थिटे

प वन मावळातील अत्यंत महत्त्वाच्या गावांमध्ये ऊर्से गावाची गणना केली जाते. गेल्या पंचवीस वर्षांत गावाचा झालेला विकास लक्षणीय आहे. ऊर्से गावाचे ग्रामदैवत श्री पद्मावती देवी असून, गावातील मध्यवर्ती भव्य मंदिरात तीन गाभारे आहेत. यामध्ये मधोमध श्री पद्मावती, जोगेश्वरी आणि भैरवनाथ यांच्या मूर्ती असून उजवीकडे राम, लक्ष्मण आणि सीतामाता तर डावीकडे विठ्ठल-रखुमाई यांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंदिरासमोर असलेले शिवकालीन तळे हे गावाचे मुख्य आकर्षण असून, तालुक्यात मंदिरासमोर भव्य तळे असलेले हे एकमेव ठिकाण मानले जाते. दरवर्षी नवरात्र, काकड आरती आणि इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात.

गावातील विकास
अकरा सदस्यांची ग्रामपंचायत असून, तिचे उत्पन्न कोटीच्या पुढे असल्याने ऊर्से ही तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक आहे. पंचवार्षिक निवडणुका पक्षविरहित पद्धतीने आणि विकासाला प्राधान्य देऊन पार पडतात. गावातील ज्येष्ठ मंडळींसोबत नव्या पिढीतील तरुणही कारभारात सक्रिय सहभाग घेत असल्याने निर्णयप्रक्रियेत आणि विकासकामात उत्तम समन्वय राखला जातो. गावाचा विस्तार मोठा असल्याने पाणी, वीज, रस्ते, शाळा आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. ऊर्सेची लोकसंख्या सुमारे पाच हजार असली तरी औद्योगिकीकरणामुळे दहा ते पंधरा हजार परप्रांतीय येथे वास्तव्यास आहेत. नव्या बांधकामांमुळे आणि विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या कामांमुळे गाव वेगाने विकसित होत आहे.

औद्योगिकीकरणामुळे प्रभाव
गेल्या पंचवीस वर्षांत ऊर्से परिसरात मोठे औद्योगिकीकरण झाले आहे. या उद्योगांच्या माध्यमातून गावाच्या विकासात पंच्याहत्तर टक्के योगदान मिळाले आहे, असे मानले जाते. कंपन्यांनी अत्याधुनिक सार्वजनिक शौचालये, पाणीपुरवठा योजनेसाठी मदत, वृक्षारोपण यासारख्या अनेक उपक्रमांतून गावाला हातभार लावला आहे. आज गावातील बहुतांश तरुण विविध कंपन्यांत कायमस्वरूपी नोकरीवर आहेत. तसेच हजारो तरुणांना येथे रोजगार उपलब्ध झाला आहे. कंपन्यांकडून मिळणारा कर आणि स्थानिक घरमालकांना मिळणारे भाडे या दोन माध्यमांतून गावाला मोठी आर्थिक मदत मिळते. महिंद्रा सीआय, फिनोलेक्स केबल आणि जयहिंद यासारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्या येथे कार्यरत आहेत. या कंपन्यांशी संलग्न अनेक छोटे व्यावसायिकही गावातील आर्थिक चक्रात स्थिरपणे उभे आहेत.

नव्याने उभे राहणारे गृहप्रकल्प
गावातील जमिनींचे दर गेल्या पंधरा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महामार्गालगत असल्यामुळे ऊर्से गावाचा विकास झपाट्याने झाला आहे. या शहरीकरणामुळे स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेले नोकरदार, व्यापारी आणि कामगार यांनी जागा किंवा घरे खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. प्लॉटिंगच्या माध्यमातून अनेक बांधकामे सुरू असून, पाच ते दहा लाख रुपये प्रति गुंठा भावाने जमीन मिळत असल्याने अनेक शेतकरी नव्या आर्थिक प्रगतीकडे पाऊल टाकताना दिसत आहेत. द्रुतगती महामार्गालगत अडीचशे एकरांवर उभा राहत असलेला एक मोठा गृहप्रकल्प गावाला शहराच्या स्वरूपाकडे नेऊ लागला आहे. या गृहप्रकल्पामुळे जमिनींचे भाव आणखी वाढले असून, अनेकांना उद्योगधंद्याच्या संधी तर युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

शेती क्षेत्र
गावाचा प्रवास जरी शहरीकरणाकडे होत असला तरी गावातील शेतीही सक्षमपणे उभी आहे. गावातील अनेक शेतकरी शेतीचे विविध प्रयोग करत असून, बागायती क्षेत्रात अनेक जण मोठ्या प्रमाणात शेती करतात. यापूर्वी गावातील दोन शेतकऱ्यांना कृषी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दुग्ध व्यवसायातही गाव पुढे असून, जवळपास अकराशे हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यात ऊर्से अग्रेसर आहे. गावातील आठवडा बाजार हा पंचक्रोशीतील सर्वात मोठा असून, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळते. आठवडा बाजाराबरोबरच जनावरांचा बाजार सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जनावरे खरेदीसाठी परराज्यात जाण्याची गरज राहणार नाही.

नियोजनबद्ध विकासाकडे वाटचाल
ऊर्से गावासह परिसरातील गावांचा विकास झपाट्याने होत असून, पुढील काळात हा विकास आणखी नियोजनबद्ध होण्याची अपेक्षा आहे. शहरातील गर्दीपासून दूर, पण शहराशी सतत जोडलेले असे ऊर्से गाव नागरिकांना कमी खर्चात शहरी सुविधा, स्वच्छ वातावरण आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असल्याने गृहप्रकल्पांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. बंगल्यांसाठी दोन ते तीन गुंठ्यांचे प्लॉटिंग मोठ्या प्रमाणात होत असून, यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलत आहे. नियोजनपूर्वक विकासामुळे ऊर्से गावात व्यवसाय, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून, युवकांसाठी हा परिसर भविष्यातील प्रगत केंद्र बनण्याची शक्यता आहे.

गावातील प्रवेशद्वाराजवळ व मंदिरासमोर असलेले ऐतिहासिक तळे
BBD25B03486, 87, 88

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com