मुळशी तालुक्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर

मुळशी तालुक्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर

Published on

भुकूम, ता. २६ ः मुळशी तालुक्यात शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत आहे. त्याचबरोबर कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग दिसत असतात.
तालुक्यातील भूगाव, भुकूम, पिरंगुट, उरवडे, कासारअंबोली, घोटावडे, माण गावांचे गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले आहे. येथे मोठ्या सोसायट्या, बाजारपेठा, विविध व्यवसाय, शाळा सुरू झाल्या आहेत. पुणे शहरास ही गावे जवळ असल्यामुळे शहरातील अनेक नोकरदार, व्यावसायिक येथे स्थायिक झाले आहेत. तसेच, शहरापेक्षा येथे घरे स्वस्त मिळत असल्यामुळे अनेकांनी येथे राहण्यास पसंती दिली आहे. लोकवस्ती वाढल्यामुळे सर्व प्रकारचे व्यवसाय अनेक गावातून सुरू झाले. त्यांच्या नियमित होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायतीपुढे निर्माण झाला आहे. पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे व नागरिकांची मानसिकता यामुळे रस्त्याच्याकडेने कचरा पडलेला दिसून येतो. त्याचा त्रास स्थानिक, प्रवासी व पर्यटकांना होत आहे.
याबाबत भुकूमच्या सरपंच सुवर्णा आंग्रे व उपसरपंच सचिन आंग्रे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या वतीने ठेकेदार नेमला आहे. ग्रामपंचायतीने गाड्या पुरवल्या असून, आंग्रेवाडीच्या माळरानावर कचऱ्याचा प्रकल्प उभारला आहे.
याबाबत ठेकेदार आकाश आंग्रे यांनी सांगितले, ‘‘भुकूम व भूगाव येथील कचरा आम्ही उचलतो. रस्ते व प्रत्येक वाडी, वस्तीत स्वच्छता राहील याची दक्षता घेतो. कचऱ्यावर खत प्रकल्प सुरू केला आहे.’’

घोटावडे येथील शेळकेवाडी जवळील रस्ताच्याकडेला माण येथील कंपन्या कचरा टाकत होत्या. त्यांच्यावर ग्रामस्थांनी गुन्हा दाखल केल्यापासून कचरा टाकणे बंद झाल्याचे माजी सरपंच राजाभाऊ शेळके यांनी सांगितले. दरम्यान, गावातील कचरा मुगावडे येथील प्रकल्पाला दिला जातो. त्यासाठी गाड्या व कर्मचारी नेमले असल्याचे ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत देवकांबळे यांनी सांगितले.

प्रशासनाने दखल घेण्याची गरज
मुळशी तालुका झपाट्याने बदलत आहे. आगामी काळातील बाह्यवळण रस्त्यामुळे पूर्ण शहरीकरण होईल. कचरा निर्मूलनासाठी ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत. प्रबळ यंत्रणा, प्रकल्प, कुशल कामगार नेमले पाहिजेत. कचऱ्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केले पाहिजेत. लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासन यांनी दखल घेऊन निर्णय घेणे व धोरण राबवणे आवश्यक आहे.

पिरंगुट खिंड ते घोटावडेफाट्यापर्यंत रस्त्याच्याकडेने मोठ्या प्रमाणावर नागरिक, कंपन्या रात्रीच्यावेळी हा कचरा टाकतात. याबाबत अनेकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, आजूबाजूच्या सोसायट्या, गावे येथून आठवड्यातून एकदा हा कचरा उचलला जातो. ग्रामपंचायतीने येथील माळरानावर स्वतःचा प्रकल्प सुरू केला आहे.
- चांगदेव पवळे, सरपंच, पिरंगुट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com