उजनीतील माशाला परदेशातही पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उजनीतील माशाला परदेशातही पसंती
उजनीतील माशाला परदेशातही पसंती

उजनीतील माशाला परदेशातही पसंती

sakal_logo
By

उजनी धरणांमध्ये १९७८ मध्ये पाणी अडविण्यास सुरुवात झाली. धरणांमध्ये सोन्यासारख्या जमिनी गेल्या. यामध्ये अनेकांचे संसार बुडाले. मात्र, जमिनी गेलेल्या भूमिपुत्रांना मासेमारी व्यवसायाच्या निमित्ताने आशेचा नवा किरण गवसला. यामुळे फिनिक्स पक्षी भरारी घेतो त्याप्रमाणे येथील भूमिपुत्रांनी भरारी घेतली व शेती व उद्योगांमध्ये आपले बस्तान बसविले. भिगवणचा मासा म्हणून उजनीतील माशांना पश्चिम बंगालमधील हावडा व मुंबई येथील बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. उजनीतील मासा परदेशातही निर्यात केला जातो.
-डॉ. प्रशांत चवरे, भिगवण

................................................................................................................

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या उजनी धरणाने गोड्या पाण्यातील मासेमारी उद्योगाला दिशा देण्याचे काम केले आहे. पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यासह राज्यातील व परराज्यातीलही हजारो भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे.

उजनीतील गोड्या पाण्यातील मासेमारी
सध्या गोड्या पाण्यातील मासेमारी म्हटले की, सर्व प्रथम नाव येते ते उजनी जलाशयातील मासेमारीचे. माढा तालुक्यातील भीमानगरपासून ते
पुणे जिल्ह्यातील दौंडपर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण उजनी धरणातील गोड्या पाण्यातील मासेमारी ही राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशातील मासेमारी उद्योगाला दिशा देणारी ठरली आहे. धरणांमुळे विस्थापित झालेल्या स्थानिकांना मासेमारीने रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्याशिवाय राज्यासह देशभरातील खवैय्यांची होसही भागविली आहे. पाणी साठ्याबाबत महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे असलेल्या उजनी धरणांने सोन्यासारखी शेती धरणाने गिळंकृत केल्यानंतर लोकांपुढे जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना व सुशिक्षत बेरोजगारांना मासेमारीच्या रूपाने आशेचा किरण दिसला. या मासेमारीने अनेक कुटुंबे उभी केली व त्यांना समृध्दी प्राप्त करुन दिली.

जलाशयात माशांचे वैविध्य
उजनी धरणाच्या उभारणीपूर्वी भीमा नदीवर पिढीजात मासेमारी करणारे भोई व कोळी समाजातील मच्छिमार ऋतुमानानुसार मासेमारी करत होते.
धरणाच्या उभारणीनंतर जलाशयांमध्ये नैसर्गिकरीत्या वाम, मरळ, गुगळी, शिंगटा, खदरे, घोगऱ्या आदी जातीचे मासे जलाशयात आढळून येत होते. मासेमारीच्या व्यावसायिकरणानंतर शासनाच्या वतीने धरणांमध्ये रऊ, कतला, मृगल, सायप्रनिस, तिलापिया आदी जातींचे मत्सबीजही सोडण्यात आले. यामुळे धरणामध्ये विविध प्रकारचे मासे मिळत आहेत. सध्या उजनीमध्ये तिलापिया हा मासा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. उजनी धरण परिसरातील मातीला व पाण्याला एक वेगळी चव आहे. हीच चव उजनीतील माशांनीही धारण केल्यामुळे उजनीतील मासे भिगवणचे मासे म्हणून राज्यासह देशामध्ये प्रसिध्द आहेत.


मासेमारीमुळे उजनी परिसराला समृध्दी
उजनी धरणामध्ये जमिनी गेल्यामुळे या भागातील लोकांपुढे रोजगारांचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. मासेमारीच्या रूपाने येथील लोकांना
आशेचा किरण दिसला व मासेमारीच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध मिळाल्या. सर्व जाती धर्माचे लोक मासेमारीच्या व्यवसायात उतरले आहेत. कोणी प्रत्यक्ष मासेमारीत उतरले तर कोणी माशांचा व्यापार सुरू केला आहे. इंदापूर व परिसरातील तालुक्यामधून शेतीमधून जितके उत्पादन निघते जवळपास तितकेच उत्पादन हे मासेमारी व संबंधित उद्योगातून मिळत असल्याचे चित्र सध्या आहे. मासेमारी व्यवसायांमुळे उजनी परिसराला समृध्दी प्राप्त झाली.

बाजारपेठा मोठ्या प्रमाणात विकसित
धरण परिसरामध्ये होत असलेल्या मासेमारीमुळे इंदापूर तालुक्यातील इंदापूर, पळसदेव, भिगवण, दौंड तालुक्यातील दौंड शहर, सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा तालुक्यातील जेऊर, कर्जत तालुक्यातील राशीन आदी गावांतील बाजारपेठा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत.

हॉटेल व्यवसायालाही गती
मासेमारीबरोबच या भागांमध्ये हॉटेल व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. भिगवणची मच्छी हा ब्रॅंड सध्या महाराष्ट्रामध्ये रुजत
आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माशांच्या अनेक खानावळी व हॉटेल उभी राहिली आहेत. हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून या भागामध्ये व्यवसायाला गती मिळाली आहे तर राज्यासह परराज्यातील तरुणांनाही रोजगार मिळाला आहे. येथील व्यवसायिक नियमित अनेक भागांतील हॉटेलमध्ये भिगवणची मच्छी पुरविण्याचे काम करत आहेत.

प्रदूषित पाण्यामुळे मच्छीमारीवर परिणाम
गोड्या पाण्यातील मासेमारीला दिशा देणाऱ्या उजनी धरणातील मासेमारीसमोर सध्या अनेक आव्हाने निर्माण झाली असल्याचे चित्र आहे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील प्रदूषित पाणी सोडल्यामुळे नैसर्गिकरित्या लाखो लोकांना रोजगार मिळवून देत असलेल्या उजनी धरणातील गोड्या पाण्यातील मच्छीमारी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. शासनाच्या वतीने मत्सबीज सोडण्यात होत असलेली चालढकल या व्यवसायावर परिणाम करत आहेत.

व्यवसाय वाचविण्यासाठी प्रयत्नांची गरज
मच्छीमारीसाठी असलेली आचारसंहिता व नैतिकतेचाही काहींकडून भंग होत असल्यामुळे छोट्या जाळीच्या माध्यमातून होत असलेली मासेमारी हेही एक आव्हान आहे. लाखो लोकांच्या रोजगाराशी निगडीत असलेल्या उजनी धरणातील मासेमारीने खऱ्या अर्थाने राज्यातील गोड्या पाण्यातील मासेमारीला दिशा दिली आहे. हा व्यवसाय वाचविण्यासाठी शासन पातळीवरुन गंभीर प्रयत्न करण्याची आवश्यकता मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे.

00302, 00303