
गर्भवतीने अनुभवली सुखद माणुसकी
भिगवण, ता. १४ ः माणुसकीचा झरा आटत आहे, असे वाटत असतानाच कर्नाटकातील एका गर्भवतीला महाराष्ट्र व भिगवणकरांच्या माणुसकीचा आणि सहदयतेचा सुखद अनुभव आला. कर्नाटकातील एक गर्भवती पुण्याहून खासगी बसने कर्नाटकातील गावी जात असताना अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या. बस चालकाने सदर महिलेस भिगवण येथे सोडले. त्यानंतर स्थानिक व डॉक्टरांच्या सहकार्यातून सदर महिलेची राष्ट्रीय महामार्गावरच सुखरूप प्रसूती करण्यात आली. रात्री अपरात्री संकटात सापडलेल्या कर्नाटकातील महिलेला माणुसकी व सेवाभावी वृत्तीचा सुखद अनुभव मिळाला.
कर्नाटक राज्यातील एक गरोदर महिला खासगी बसने पुण्याहून कर्नाटकातील गावी निघाली होती. बस भिगवणच्या जवळपास आली असताना सदर महिलेस अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या. बस चालकाने रात्री दोनच्या सुमारास महिलेस भिगवण येथे राष्ट्रीय महामार्गावर सोडले. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित स्थानिक नागरिकांनी महिलेची अवस्था पाहून प्रथम १०८ क्रमांकावर संपर्क साधून सरकारी रुग्णवाहिका मिळविण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित स्थानिक रहिवासी रेहान तांबोळी व हजारी देवाशी यांनी सरकारी रुग्णवाहिकेशी संपर्क होत नाही असे लक्षात आल्यानंतर खासगी रुग्णवाहिका चालक केतन वाघ यांच्याशी संपर्क साधला. खासगी रुग्णवाहिका चालक केतन वाघ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेहान तांबोळी, हजारी देवाशी व केतन वाघ यांनी सरकारी व खासगी रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तक्रारवाडी(ता. इंदापूर) येथील लाइफलाइन हॉस्पिटलच्या डॉ. योगिता भोसले यांच्याशी संपर्क होताच त्या काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचल्या. महिलेची अवस्था पाहून डॉ. योगिता भोसले यांनी सदर महिलेची राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला प्रसूती केली. त्यानंतर पुढील उपचारासाठी सदर महिलेस रुग्णालयामध्ये दाखल केले. प्रसूतीनंतर बाळ व बाळंतीण जीवावरच्या संकटातून सुखरूप बाहेर पडले.
भिगवणसारख्या अनोळखी ठिकाणी माणुसकीच्या भावनेतून अनेकांनी हात पुढे केले व आणि संकटात सापडलेल्या गरोदर महिलेला महाराष्ट्र व भिगवणकरांच्या माणुसकीची सुखद अनुभव मिळाला. शेवटी खासगी रुग्णवाहिकेतून सदर महिला व बाळाची तिच्या गावी रवानगी करण्यात आली. महिलेला मराठी भाषा येत नव्हती. परंतु, तिच्या चेहऱ्यावर व डोळ्यात कृतज्ञतेची भावना दिसत होती.