
साताऱ्याच्या तरुणांकडून मर्दानी खेळाचे सादरीकरण
भिगवण, ता.२० : भिगवण स्टेशन (ता.इंदापूर) येथे पारंपरिक नृत्य स्पर्धा, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, शिवप्रतिमा मिरवणूक व व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
सातारा येथील तरुणांनी सादर केलेल्या मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. यामुळे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी सरपंच पराग जाधव यांचे हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ९० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त आयोजित पारंपरिक नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. मर्दानी खेळाच्या उपक्रमासाठी स्व. रमेशबापु जाधव फाउंडेशनच्या वतीने सहकार्य करण्यात आले.
यावेळी तुषार क्षीरसागर, अशोक शिंदे, अभिमन्यू खटके, तानाजी वायसे, कपिल भाकरे, दत्तात्रेय धवडे, गुराप्पा पवार, जावेद शेख, सत्यावन भोसले, अण्णा काळे, मच्छिंद्र खडके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. महेश देवकाते, सचिन बोगावत, अजिंक्य माडगे, प्रशांत शेलार, प्रदीप वाकसे, अण्णासाहेब धवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, शिवव्याख्याते अफसर शेख यांचे छत्रपती शिवराय आणि आजचा महाराष्ट्र या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी शेख म्हणाले, छत्रपतींचे शिवाजी महाराज यांचे कार्य हे कोणत्याही जातीसाठी नसुन मातीसाठी होते. शिवविचार सर्व समाजाला बांधुन ठेवण्याचा एक महत्वाचा धागा आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजाने शिवविचाराचे जागर करण्याची आवश्यकता आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने होत असलेला हा विचारांचा जागर समाज प्रबोधनासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल.
शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठल म्हस्के यांनी प्रास्ताविक व संजोयन केले. मिलिंद जगताप सूत्रसंचालन तर राम सातपुते यांनी आभार केले.
................................
00392