
‘दत्तकला’च्या सुरक्षारक्षकास शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हा
भिगवण, ता. २७ : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या सुरक्षा रक्षकास दमदाटी व शिवीगाळ करणाऱ्या तिघांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सुरक्षा रक्षक आनंद लक्ष्मण माने यांनी दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, स्वामी चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये महाविद्यालय सुटल्यानंतरही पाटस येथील तरुणांनी सुरक्षा रक्षकास गेट उघडण्यास सांगितले. यावेळी सुरक्षा रक्षक आनंद लक्ष्मण माने, तात्यासाहेब भालेराव व ज्ञानेश्वर गोळे यांनी महाविद्यालय सुटले आहे, त्यामुळे आता गेट उघडता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे या तरुणांनी त्यांना वाहनामधून उतरून शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरवात केली. याबाबत सुरक्षा रक्षक आनंद लक्ष्मण माने यांनी दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सबंधिताविरुध्द अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली. पोलिसांनी तातडीने केलेल्या या कारवाईमुळे शैक्षणिक संकुल परिसरामध्ये दादागिरी करणाऱ्या चाप बसणार असल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.