उजनीची वाटचाल भरतपूरच्या दिशेने

उजनीची वाटचाल भरतपूरच्या दिशेने

Published on

भिगवण, ता. १३ ः उजनी धरण व भीमा नदीतील खदरा, कोयरा, नकटा, तांबेरा आदी देशी प्रजातीचे मासे दुर्मिळ झाल्याचे विविध अभ्यासातून स्पष्ट होत आहे. उजनीतील मासे, पर्यटन व पर्यावरण शेवटच्या घटका मोजत आहे. यांना वाचवा अन्यथा उजनीचे भरतपूर झाल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे यांनी दिला.
उजनीतील मासे, पर्यटन व प्रदूषण यांविषयी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व सिप्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. काटवटे बोलत होते. या प्रसंगी सिप्ला फाउंडेशनचे प्रमुख अनुराग मिश्रा, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अर्चना शिंदे, सिप्लाचे कुरकुंभ युनिटचे अमोल सरमंडल, नरेंद्र सिंग, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार, मत्स्य अभ्यासक भरत मल्लाव, दीपाली गुंड, अनिल नगरे, बलभीम भोई आदी उपस्थित होते.
डॉ. काटवटे पुढे म्हणाले की, ‘‘येथील लहान माश्यांवर मोठे मासे व पक्षी अवलंबून असतात. मात्र, या प्रजाती नष्ट होत असल्याने पक्ष्यांना नाईलाजाने चिलापीसारखे मासे खावे लागतात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने मागील काही दिवसांपासून करण्यात आलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. त्यावर उपाय म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने देशी माश्यांच्या प्रजाती उजनीत सोडल्या जाणार आहेत.’’
यावेळी सिप्ला फाउंडेशनचे अध्यक्ष अनुराग मिश्रा म्हणाले की, उजनी धरणातील जल व पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्वाचे आहे. जलसंर्वधन, प्रवाशी पक्ष्यांना लागणारे लहान मासे, देशी माश्यांच्या प्रजातीचे संवर्धन यांवर भर दिला जाणार आहे. वैष्णवी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

...अन्यथा भरतपूरसारखी अवस्था
राजस्थानमधील जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखले गेलेल्या भरतपूरमधील पक्षी निवासस्थानाची अवस्था बिकट बनली आहे. तेथे पक्षी, मासे राहिले नाहीत, त्यामुळे व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे. उजनीची वाटचालदेखील त्याच दिशेने सुरू असून वेळीच याचा धोका ओळखून स्थानिक मच्छिमार, मत्स्यव्यवसाय, पाटबंधारे, महसूल आदी विभागांनी सहकार्य केल्यास उजनीला पूर्ववैभव प्राप्त होऊ शकते.

संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मैदानात
लहान मासे जगले तरच मोठे मासे जगू शकतात. लहान देशी माश्यांवरच पक्षी वैभव अवलंबून आहे. त्यामुळे लहान व देशी माश्यांचे संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकावर आहे. उजनीतील सेंगळ, सुबर, आहेर, तांबेरा, खदरा, कोळीस, घोगरा, शिंगी, चालट, वाम, शिंगटा आदी देशी माश्यांच्या प्रजातींचे संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी काम करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com