
भोर येथे डॉ. गणेश देवी यांचा सत्कार
भोर, ता. १३ ः येथील भोर एज्युकेशन सोसायटी, श्रीमंत गंगूताई पंतसचिव वाचनालय, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि साहित्य परिषदेच्या वतीने पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. गणेश देवी यांचा सत्कार करण्यात आला.
येथील मूकबधिर विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात राजगड ज्ञानपीठाच्या सचिव स्वरूपा थोपटे यांच्या हस्ते गणेश देवी यांचा सत्कार झाला. चरखा, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद गुजर, सचिव विकास मांढरे, सुरेश शहा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सल्लागार डॉ. अरुण बुरांडे, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे-केळकर, प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, डॉ. प्रदीप पाटील, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मूळचे भोरचे असलेले गणेश देवी यांनी भोरमधील लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत विविधता, धार्मिकता, सहिष्णुता आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची सवय भोरवासियांनी शिकवली असल्याचे सांगितले. त्यामुळे माझ्या जीवनाच्या जडणघडणीत भोरचा मोलाचा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. सविता कोठावळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.