
पसुरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
भोर, ता. २० : येथील पसुरे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार येसाजी कंक यांचे वंशज शशिकांत कंक यांनी पसुरे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संगणक शिक्षणासाठी ६६ हजारांची शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाहीर केले आहे.
या विद्यालयामधील दहावीच्या १४ आणि बारावीच्या १९ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
यावेळी भुजंगराव दाभाडे, ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण धुमाळ, उपसरपंच अनंत सणस, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गोरे, रमेश धुमाळ मुख्याध्यापक आनंदराव वीर आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर भोरमधील रोबोकॉब कॉम्प्युटर्स आणि टिटेघर (ता. भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठान यांच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी राय़टींग पॅडचे मोफत वाटप केले. विद्यालयात भौतिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये देणार असल्याचे शशिकांत कंक यांनी यावेळी सांगितले. विद्यालयातील शिक्षक लालासो कोकरे, वैशाली पळशीकर, स्वप्नाली खोपडे, दीप्ती सातपुते, जयश्री पडवळ व मारुती चिकणे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. भरत नराळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व अशोक बोडके यांनी आभार मानले.