
व्हिक्टोरिया ज्युबिली जलाशय होणार पुर्नजिवित
भोर, ता. २३ : शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी १३५ वर्षापूर्वी बांधलेल्या व्हिक्टोरिया ज्युबिली जलाशयाच्या स्वच्छतेचे काम नगरपालिकेने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. यामुळे १६ फेब्रुवारी १८८७ मध्ये कार्यान्वित झालेला आणि जुन्या जेल (आताच्या न्यायालयाच्या) शेजारी असलेला हा जलाशय प्रथमच पुर्नजिवित होणार आहे. शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण व शहराचे सौंदर्यीकरण उपक्रमाअंतर्गत शहरातील जलसाठे पुर्नजिवीतीकरण करण्यात येत आहेत.
व्हिक्टोरिया जलाशयामध्ये असलेली झाडेझुडपे दलदल आणि गाळही काढण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिका फंडातून सुमारे २ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पुढील १५ दिवसांमध्ये या जलाशयाच्या स्वच्छतेचे काम पूर्ण होणार आहे.
भोरचे तत्कालीन राजे शंकरराव ऊर्फ रावसाहेब पंतसचिव यांच्या कारकिर्दीत इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया भोरला आल्या होत्या. त्यामुळे या जलाशयास व्हिक्टोरिया ज्युबिली जलाशय असे नाव देण्यात आले होते. भोर शहराला पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी हा जलाशय बांधण्यात आला होता. रामबाग येथील ओढ्यावर बंधारा बांधून तेथून पाणी या जलाशयात आणण्यात आले होते. जलाशयावर पाणी शुद्धीकरण प्रकल्पही कार्यान्वित होता. संपूर्ण शहराला विजेशिवाय ग्रॅव्हीटीने पाणीपुरवठा केला जात होता. याच पाण्याचा वापर करून राजवाडा चौकातील कारंजे सुरू होत होते. सुमारे शंभर वर्षे ही पाणीपुरवठा योजना सुरू होती. मात्र भाटघर धरणावरून भोर शहराला पिण्याच्या पाण्याची योजना सुरू केल्यानंतर ही जुनी पाणीपुरवठा योजना बंद झाली. गेल्या ३५ वर्षात या जलाशयाकडे कोणीही लक्ष दिले नाही.
व्हिक्टोरिया जुबली जलाशयाची स्वच्छता व साफसफाई झाल्यानंतर त्या वास्तूचे जतन केले जाणार आहे. त्याठिकाणी नवीन पर्यटनस्थळ, बगीचा, जॉगिंग पार्क किंवा ऐतिहासिक शिवसृष्टी यासारखे उपक्रम करण्याचा विचार केला जाणार आहे. यासाठी नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी निर्णय घेतील.
- किशोरी फणसेकर, स्वच्छ भारत सर्वेक्षण विभाग, भोर नगरपालिका
01352