
भोरमध्ये दोन ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरी
भोर, ता. २३ : भोर शहरातील श्रीपतीनगर परिसरातील दोन ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे सोमवारी (ता.२०) रात्री चोरीला गेले. श्रीपतीनगर परिसरातील प्राथमिक शिक्षक सहकार भवनातील ‘ओम कोचिंग क्लासेस’च्या बाहेरच्या बाजूला असलेले दोन आणि डॉ. योगेंद्र आगटे क्लनिक यांच्या बाहेरील बाजूस असलेला एक, अशा तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरी झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मुले चोरी करण्यासाठी घुटमळताना दिसत आहेत. डॉ. आगटे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरी केल्यानंतर ‘ओम कोचिंग क्लासेस’च्या कॅमेऱ्याची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. घटनास्थळ हे पोलिस ठाण्यापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आहे. ‘ओम कोचिंग क्लासेस’चे परमेश्वर कोठुळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे चोरीच्या घटनेमुळे भोर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.