अन्‌ सर्वांचा जीव पडला भांड्यात...

अन्‌ सर्वांचा जीव पडला भांड्यात...

भोर, ता. १० : महाडमार्गे मुंबईला निघालेली मोटार शनिवारी (ता.८) सायंकाळी वरंधा घाटातून अचानक गायब झाली. वरंधा घाटात मुसळधार पाऊस पडत असतो आणि मोटारीतील सर्वांचे फोन बंद होतात. मोटारीत ४ महिन्याची लहान मुलगी आणि ६५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेसह ४ महिला आणि २ पुरुष होते. महाडला पाहुण्यांना भेटून ते पुढे मुंबईला जाणार होते. मात्र, भोर तालुक्यातून दुपारी साडेतीन वाजता निघालेली मोटारीचा थांगपत्ता लागत नाही.
मोबाईल बंद असल्यामुळे संबंधिताचे नातेवाईक घाबरले व सर्वत्र फोनाफोनी सुरू होते. गायब झालेल्या व्यक्ती या ठाणे जिल्ह्यातील एका खासदाराचे निकटवर्तीय असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील भोर, रायगड जिल्ह्यातील महाड, नवी मुंबई येथील पोलिसांचा शोध सुरू होतो. भोरहून निघालेली मोटार महाडला पोचलीच नाही. त्यामुळे वरंधा घाटातच काहीतरी झाले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला.
भोरमधील आणि महाडमधील रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी पोलिसांसोबत घाटातील धोकादायक ठिकाणांवरून शोधमोहीम राबवली. रात्रीच्या काळोखात घाटातील भल्यामोठ्या दरींमध्येही शोध घेतला परंतु ना गाडी भेटली ना गाडीतील प्रवाशी. मध्यरात्री एक वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती. महाडचे पोलिस शिवथरघळ येथे गेले असता त्यांना तेथे संबंधित मोटार आणि मोटारीतील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समजले. घाटात मुसळधार पाऊस असल्यामुळे पुढे न जाता मोटारीतील व्यक्तींनी शिवथरघळ येथे ओळखीच्या व्यक्तींकडे मुक्काम करण्याचे ठरविले. परंतु तेथे दोन दिवस वीज नसल्यामुळे मोबाईलचे नेटवर्क आणि मोबाईल रिचार्ज करता आले नाही. त्यामुळे त्यांना कोणालाही कळविता आले नाही. पोलिसांसह रेस्क्यू फोर्सला आठ तास शोध मोहीम राबविली. संबंधितांना शोधल्याची खात्री केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाशी आणि पुणे पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या नातेवाइकांना मोटारीसह सर्वजण सुखरूप असल्याची खबर दिली आणि यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com