भोर येथे कामगारांची धोकादायक वाहतूक
भोर, ता. २५ : कापूरहोळ-भोर-मांढरदेवी-वाई या मार्गावरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. भोर येथून संबंधित ठेकेदार रस्त्याच्या कामावरील कर्मचाऱ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करीत आहेत. यामुळे अपघात होऊन कामगार तसेच इतर प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. डंपर, ट्रॅक्टरसहीत चक्क जेसीबीमध्ये कोंबून कामगार आणले जात आहेत. यामुळे ठेकेदारावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिस आणि इतर शासकीय यंत्रणा याकडे डोळेझाक करीत आहेत. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात पुरेशी काळजी न घेतल्यामुळे वाहनचालकांना आणि प्रवाशांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे दुचाकी व मोटारींचे अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. याशिवाय ठेकेदाराने कामावर ठेवलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. परराज्यातून आलेल्या कामगारांची नोंद पोलिस ठाण्यात केलेली नाही. कामगारांकडे ओळखपत्र नाहीत. माती, डबर, खडी व मिक्स काँक्रिटचे डंपर आणि इतर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे या गोष्टी तर राजरोसपणे सुरू आहेत. याशिवाय डंपरचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातात एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि इतर कामगारांनी व ठेकेदाराने अपघातग्रस्त महिलेला उपचारासाठी दाखल करण्याऐवजी सर्व कामगार घटनास्थळावरून निघून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. आता तर एका जेसीबीमधून चक्क ११ कामगार जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचे चित्र आहे.
पोलिसांकडून कारवाईकडे दुर्लक्ष
कामगारांच्या वाहतुकीबाबत विशेष म्हणजे पोलिस ठाण्यासमोरच असे प्रकार सुरू आहेत. पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. दुचाकीवर तिघेजण प्रवास करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतात. मात्र उत्सखनाच्या कामासाठी असलेल्या जेसीबीमधून चक्क ११ जण प्रवास करतात. त्यावर पोलिसांना त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
03482
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.