खाकी वर्दीतही माणुसकी जपणारा पोलिस

खाकी वर्दीतही माणुसकी जपणारा पोलिस

खाकी वर्दीतून माणुसकी जपणारे अण्णासाहेब

महाराष्ट्र पोलिस विभागाच्या ‘सद् रक्षणाय, खल निग्रहणाय’ उक्तीप्रमाणे गुन्ह्यांचा योग्य तपास करणे, गुन्हेगारांवर कारवाई करणे या खात्यातील कामांबरोबर माणुसकी दाखवीत गुन्हे करणाऱ्यांच्या मनात परिवर्तन घडविणारे पोलिस अधिकारी म्हणजे भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मन्याबा पवार. गुन्हे घडू नयेत, यासाठी विशेष प्रयत्न करणे, अनेक प्रकारच्या उपाययोजना करून जनतेची सेवा करणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
-अण्णासाहेब पवार, पोलिस निरीक्षक, भोर पोलिस ठाणे

पोलिस खात्यातील ३३ वर्षांच्या सेवेत त्यांनी पोलिसांच्या विविध विभागात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. खंडाळा (जि. सातारा) तालुक्यातील बावडा या गावात अशिक्षित शेतकरी कुटुंबात अण्णासाहेब पवार यांचा १९७०ला जन्म झाला. दुष्काळी भागातील जेमतेम शेती असूनही वडिलांनी त्यांना शाळेत जाण्यापासून रोखले नाही. उलट आई-वडिलांनी त्यांना शरीरयष्टी बनविण्याची आणि शिकण्याची प्रेरणा दिली. बावडा गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आणि खंडाळा येथे ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण घेतल्यानंतर भोर (जि. पुणे) येथील महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. १९९१ला ते मुंबई पोलिस दलात शिपाई पदावर भरती झाले. आपल्या मैदानी आणि मल्लखांब खेळात त्यांनी प्रावीण्य मिळविल्यामुळे त्यांना प्रशिक्षण काळात विशेष कौतुक झाले. मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त श्रीराम मूर्ती यांच्या हस्ते अण्णासाहेब पवार यांचा सन्मान करण्यात आला.

विशेष प्रमाणपत्र देवून गौरव
मुंबईत चार वर्षानंतर ते पोलिस हवालदार आणि दहा वर्षात त्यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली. त्यांनी मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष, विशेष सुरक्षा विभाग, देवनार पोलिस ठाणे आणि जलद प्रतिसाद पथकात काम केले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर असताना मुलुंड वाहतूक शाखा, संरक्षण व सुरक्षा शाखा आणि मानखुर्द पोलिस ठाण्यात उत्तम कामगिरी केली. मुंबई वाहतूक शाखेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना तत्कालीन पोलिस सहआयुक्त श्री उपाध्याय यांच्या हस्ते गौरविण्यात आले. २०१७मध्ये पवार यांनी मुंबईतील आरसीएफ पोलिस ठाण्यात प्रथम पोलिस निरीक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी गंभीर गुन्ह्यांचा जलद गतीने तपास केल्याबद्दल पोलिस खात्याकडून त्यांचा विशेष प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिस विशेष शाखा क्रमांक १ मध्ये त्यांनी काम केले. २०२३ला पुणे ग्रामीण पोलिस विभागात त्यांची बदली झाली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत काम करताना त्यांनी मोठमोठ्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींवर कारवाई केली. त्यानंतर जानेवारी २०२४ पासून ते भोर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून काम करीत आहेत.

कार्याला सलाम...!
ज्या परिसरात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले, त्याच शहरात पोलिस निरीक्षक म्हणून काम करू लागले आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रेरणा मिळत आहे. आपणही अशिक्षित शेतकऱ्याच्या कुटुंबातील असल्यामुळे वाया जात असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे भोर शहर आणि तालुक्यातील अनेक तरुण-तरुणींनी वाईट सवयी सोडून दिल्या आहेत. काही मुलांनी गुन्हेगारी वृत्ती सोडून दिली आहे. अजूनही ते शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षण, संस्कार आणि प्रशासकीय कामात सहकार्य करीत आहेत. अशा शेतकरी कुटुंबातील पोलिस अधिकाऱ्याला सलाम...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com