भोरमधून सुप्रिया सुळे यांना दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य

भोरमधून सुप्रिया सुळे यांना 
दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य

भोर, ता. ५ ः बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे १ लाख ५८ हजार ३३३ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला. सुप्रिया सुळे यांना ७ लाख ३२ हजार ३१२ तर सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७३ हजार ९७९ मते मिळाली आहेत. सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून ४८ हजार १६८ मतांचे मताधिक्य मिळाले तर भोरमधून ४३ हजार ९०५ मतांचे मताधिक्य मिळाले. बारामती मतदारसंघानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य सुळे यांना भोर विधानसभा मतदारसंघातून मिळाले.

भोर मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना १ लाख ३४ हजार २४५ तर सुनेत्रा पवार यांना ९० हजार ४४० मते मिळाली. गतवेळच्या २०१९मध्ये सुप्रिया सुळे या १ लाख ५५ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांना भोर विधानसभा मतदार संघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातून केवळ १९ हजार ६०४ मतांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी सुप्रिया सुळे यांना भोरमधून २४ हजार ३०१ मतदान जास्त झाले आहे. गतवेळी तर सुप्रिया सुळे यांना भोर शहरातून विरोधी उमेदवारापेक्षा १ हजार ९०० मते कमी मिळाली होती. परंतु यावेळी शहरातून सुप्रिया सुळे यांना सुमारे अकराशे मतांचे मताधिक्य मिळाले आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विजयात भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्यासह भोर, राजगड (वेल्हे) व मुळशी तालुक्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. भोर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे जवळ-जवळ सर्वच स्थानिक नेते हे अजित पवार यांच्यासोबत गेले. परंतु, कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी आघाडीच्या धर्माचे पालन करून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. संग्राम थोपटे यांनी मतदारसंघातील तीनही तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळून त्यांच्या विजयातील गेम चेंजर ठरले. अर्थात त्यांना मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची साथ होतीच. भोर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हे अजित पवारांकडे होते. परंतु मतदारांनी त्यांनाही न जुमानता सुप्रिया सुळे यांना साथ दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा फोल
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी भोर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या सभा झाल्या. भोरमधील स्थानिक प्रश्नांवर विचार करायला लावणाऱ्या योजना जाहीर केल्या. भोर तालुका आर्थिक मागासलेला का राहिला आणि आम्ही सत्तेत आल्यावर कोणकोणत्या नवनवीन उपाययोजना करणार याबद्दल घोषणा जाहीर केल्या. हे सर्व खरे असले तरीही मतदारांनी सुप्रिया सुळे यांनाच पसंती दिली. महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार, कॉंग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, सुनील केदार, डॉ. अमोल कोल्हे, अशोक मोहोळ, विदुरा नवले आदींसह आमदार संग्राम थोपटे यांनी सभा घेतल्या. निकालानंतर महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्या पराभवाची कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तुकडे केल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या स्थानिक नेत्यांचा आत्मविश्वास भोरमधील मतदारांनी धुळीला मिळवला. अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे भाजपचे काही कार्यकर्तेही नाराजी व्यक्त करीत होते.

सुप्रिया सुळे यांच्या जमेच्या बाजू
- तीन वेळा खासदार असल्यामुळे जनसंपर्क चांगला
- शरद पवार यांना मिळालेली सहानुभूती
- दलित, ओबीसी आणि इतर संघटनांनी सुप्रिया सुळेंना दिलेला पाठिंबा
- आमदार संग्राम थोपटे यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे कॉंग्रेसचे मतदान सुप्रिया सुळेंकडे झुकले.
- प्रचारात भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकांचा फटका अजित पवारांना बसला.

भोर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न
- १५ वर्षात भोर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सुटलेला
नाही.
- मतदारसंघात पर्यटनाला हव्या त्या प्रमाणात चालना मिळालेली नाही.
- मुळशी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण नाही.
- मुळशी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना टप्पा क्रमांक दोनचे काम अपूर्ण आहे
- हिंजवडी एमआयडीसीमधील वाहतूक व रहदारी याबाबत ठोस उपाययोजना नाहीत त्यामुळे कंपन्यांचे स्थलांतर सुरू झाले.
- मुळशी धरणग्रस्तांचे काही प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.


निवडणुकीनंतरचे राजकारण
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे निवडून आल्यामुळे आगामी विधानसभा, नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर नक्कीच परिणाम होईल. खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार संग्राम थोपटे आणि शिवसेना उबाठा पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com