भोर शहरात थंडी, ताप, डेंगीच्या रुग्णांत वाढ

भोर शहरात थंडी, ताप, डेंगीच्या रुग्णांत वाढ

Published on

भोर, ता. ७ : भोर शहरात थंडीताप, जुलाब, चिकून गुनिया व डेंगी सदृश्य आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील सर्व दवाखाने व हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. सद्यस्थितीच्या पावसाळी वातावरणामुळे आणि शहरातील नागरिकांकडून होत असलेल्या अस्वच्छतेमुळे डासांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील मंगळवार पेठ, बजरंग आळी, राजवाडा चौक, शिवपुरी आळी, नवी आळी, वेताळ पेठ व श्रीपतीनगर परिसरात रुग्णांची संख्या वाढत आहे.

शहरातील रामबाग येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाबरोबर खासगी दवाखानेही रुग्णांनी भरलेले दिसत आहेत. थंडीताप, पोटदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, बोटे आखडणे, अशक्तपणा, अंगावर पुरळ येणे, चेहऱ्यावर कांजण्यासारखे काळे व्रण येणे आणि कणकण अशा लक्षणांचे रुग्ण उपचारासाठी दवाखान्यांमध्ये जात आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरात रिमझीम पाऊस सुरु आहे. शहरात कचरा गोळा करण्यासाठी नगरपालिकेची घंटागाडी फिरत असूनही काही महिला कचरा उघड्या आणि अडगळीच्या ठिकाणी टाकत असतात. तरी शहरातून बाहेर जाणाऱ्या चार-पाच मार्गांवरही कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. मंगळवारी आठवडे बाजाराच्या दिवशीही बाजारातील व्यावसायिक रस्त्यावर एका ठिकाणी कचऱ्याचा ढीग न ठेवता इतरत्र टाकून जात आहेत. यामध्य प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी दलदल होत आहे. भोर नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना आजाराला तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नगरपालिकेमार्फत औषध फवारणी सुरू केली आहे. मात्र एकच मशिन असल्यामुळे थोडा विलंब होत आहे. नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा आणि परिसरात घाण करू नये. असे आवाहनही मुख्याधिकारी श्रीराम पवार यांनी केले.

भोरमधील नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घराशेजारी पाण्याचे साठे बंद करावेत, पाणी भरपूर व उकळून प्यावे आणि नगरपालिकेच्या शाळा क्रमांक २ मध्ये दुपारी २ ते रात्री ८ या वेळेमध्ये सुरु असलेल्या आपला दवाखानामध्ये जाऊन उपचार घ्यावेत. याशिवाय उपजिल्हा रुग्णालय आणि तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन उपचार घ्यावेत. - - डॉ. जयकुमार कापशीकर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी.

03809

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.