संस्थानकाळापासून धार्मिक ऐक्याचे प्रतीक ‘भोरेश्वर’
विजय जाधव : सकाळ वृत्तसेवा
भोर : भोरमधील भोरेश्वराचे मंदिर हे संस्थानकाळापासून धार्मिक ऐक्याचा प्रतिक मानले जाते. येथे दर श्रावणात तसेच इतर सोमवारी दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. तसेच इतर अनेक पर्यटकही येथे दर्शनासाठी येत असतात.
भोरच्या राजवाड्याच्या मागील बाजूस सुरेख काळ्या चिरेबंदी दगडांमध्ये बांधलेले शंभूमहादेवाचे मंदिर आहे. काळ्या चिरेबंदी दगडात मंदिराभोवती व मंदिराच्या खांबांवर, छतावर कोरीव नक्षीकाम केलेले आढळून येते. भोरचे राजे सदाशिवराव चिमणाजी पंतसचिव यांच्या कारकिर्दीत १७८३ मध्ये हे मंदिर बांधण्यात आले.
भोरेश्वर मंदिरात दररोज पहाटे आणि सायंकाळी सनई-चौघडा वाजत असत. ही परंपरा आजही सुरू आहे मात्र आता अत्याधुनिक ध्वनीक्षेपकांमधून सनईचौघडा वाजविण्यात येत आहे. मंदिराच्या चारही बाजूने दगडी संरक्षक भिंत असून प्रवेशद्वारात सुरेख दगडी कमान आहे. मुख्य शिखराच्या भोवती चार कोपऱ्यात चार मेघडंबरींची रचना आहे. मंदिराच्या शिखरासाठी चपट्या विटांचा उपयोग केला असून बांधकामासाठी चुन्याचे मिश्रण वापरले आहे.
मंदिराच्या आवारात दगडी नंदी, तुळशी वृंदावन, स्तंभ व उजव्या बाजूला भैरोबाचे छोटे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारात एकाच दगडात घडवलेला नंदी आहे. त्याला दगडातील कमान असून मंडप व कळस आहे. मंदिराच्या आत सभागृह व गर्भगृह असे दोन भाग असून सभागृहाच्या प्रवेशद्वाराच्या वर गणेशपट्टी व खालच्या बाजूला हिंदू प्रतीक ‘किर्तीमुखब’ म्हणजेच काल्पनिक राक्षसाचा मुखवटा आहे. सभागृहाच्या मधोमध कासव व गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस सभामंडपातच डाव्या बाजूला रेणुकादेवी व उजव्या बाजूला श्रीगणेशाच्या मूर्ती आहेत. याच सभागृहात डावीकडे व उजवीकडे हवा, उजेड येण्यासाठी सुरेख अशा दोन खिडक्या आहेत. सभामंडपाच्या वरच्या बाजूला कमळाचे चिन्ह आहे मंदिराच्या आतील छताचे चारही कोपरे वक्राकार बांधले आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारात वर गणेशपट्टी तर खाली किर्तीमुख आहे. गर्भगृहात शंकराची पिंड असून, त्यामागे माता पार्वतीची मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस दिवे लावण्यासाठी कोनाडे आणि मागील बाजूस दोन छोटे हौद आहेत.
भोरेश्वर मंदिराचे बांधकाम हे सुमारे २२५ वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे कळसाच्या बाजूने व दगडी भिंतींच्या मधून पाणी झिरपून आत येत होते. त्यामुळे आतील रंग दरवर्षी खराब होत होता. शिवाय मंदिरात पाणी येत होते. माजी नगरसेवक यशवंत डाळ यांच्या पुढाकाराने दानशूर व्यक्ती व संस्थांच्या सहकार्याने भोर देवस्थान विश्वस्त मंडळामार्फत फेब्रुवारी २०२२ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला
भोरमधील जुने डॉक्टर दिवंगत भास्कर सीताराम बापट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे नातू प्रसाद चाफेकर यांनी सनई-चौघड्याची सिस्टीम भेट दिलेली आहे. देवस्थान ट्रस्टमार्फत मंदिराची देखभाल केली जात आहे. मंदिरात इतरही धार्मिक कार्यक्रम केले जात आहेत.
भोरेश्वर मंदिर हे शहरात राजवाड्याच्या पाठीमागे असल्यामुळे सभोवती रहिवासी वाडे आणि शासकीय कार्यालये आहेत. भोरेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी भोरच्या एसटी बसथांब्यावरून चालत पाच मिनीटे लागतात. भोरेश्वर मंदिराच्या जवळच नीरा नदीवरील शनीघाट आहे. तेथे विरंगुळा म्हणून अनेक पर्यटक थांबतात.
05580, 05582
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.