भोरला जाणारी एसटी बंद पडल्याने प्रवाशांचे हाल
भोर, ता. ९ : भोर-टिटेघर एसटी करंजे गावच्या फाट्यावर मंगळवारी (ता. ९) सकाळी बंद पडल्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी आणि भोरला आठवडे बाजाराला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. भोर आगारातील एसटीच्या नवीन १० गाड्या सोडल्या, तर इतर सर्व गाड्या या जुन्या आणि वाहतुकीस योग्य नाहीत. याचा मंगळवारी पुन्हा एकदा अनुभव आला. मंगळवारी सकाळी १० वाजता एसटी (क्रमांक एमएच०७ सी ९०४२) ही भोर एसटी स्टँडवरून टिटेघरला गेली. सकाळी ११ वाजता पुन्हा भोरला जाण्यासाठी निघाली. साडेअकराच्या सुमारास एसटी करंजे गावच्या फाट्यावर प्रवासी घेण्यासाठी थांबली. परंतु ती पुन्हा सुरूच झाली नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि आठवडे बाजाराला भोरला निघालेले प्रवासी अडकून पडले. आंबवडे खोऱ्यातून भोरला येण्यासाठीच्या गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना भोरला येण्यासाठी दुसरी गाडी मिळाली नाही. चालक अंकुश कोळे आणि वाहक शंकर खोपडे यांनी एसटी बंद पडल्याची माहिती वाहतूक नियंत्रक शरद गायकवाड यांना दिली. त्यांनी त्वरित एसटी दुरुस्तीसाठी वर्कशॉपमधील कर्मचारी पाठवून एसटी दुरुस्त केली.
एसटीच्या गाड्या जरी जुन्या असल्या तरीही त्या सुस्थितीत नसतात. एसटीच्या बाहेरच्या बाजूचे पत्रे निघालेले असतात, पाठीमागच्या लाइट बंद असतात, बसण्याची बाके तुटलेली असतात, गाड्या धूर सोडतात, खिडक्यांना काचा नसतात आणि खिडक्या तुटलेल्या असतात, गाडीत बसल्यावर खूप खडखड आवाज येतो आणि गाडीत स्वच्छताही नसते. अशा प्रकारच्या अडचणी प्रवाशांसमोर असतात. किमान गाड्या स्वच्छ असाव्यात, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.