भोरला शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

भोरला शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

Published on

भोर, ता. १७ : नगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी आमदार शंकर मांडेकर व माजी आमदार संग्राम थोपटे यांनी शहरातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत फेरी काढून आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या ६ उमेदवारांसह तब्बल ११३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारांनी एकूण ८ अर्ज, तर नगरसेवकांच्या २० पदांसाठी १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
भाजपच्या वतीने काढलेली रॅली माजी आमदार थोपटे यांच्या कार्यालयापासून सुरु झाली आणि चौपाटी शिवाजी रोड मार्गे नगरपालिकेसमोर आली. आमदार मांडेकर यांची रॅली एसटी स्टँडवरून सुरु झाली. मंगळवार पेठ, वेताळ पेठ, चौपाटी मार्गे रॅली नगरपालिका चौकात आली. नगरपालिकेच्या परिसरात अर्ज दाखल करण्याच्या वेळी दोन्ही रॅली समोरासमोर आल्याने दोन्ही बाजूच्या वाद्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या वतीने एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा केली नाही. दोन्हीही पक्षांच्या उमेदवारांना पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाट पहावी लागली.
पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी ५ अधिकारी आणि ३० पोलिस कर्मचाऱ्यांसह कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मंगळवारी (ता. १८) सकाळी ११ वाजल्यापासून अर्जाच्या छाननीला सुरुवात होणार असल्याचे निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे, अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली जायगुडे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com