‘रिपब्लिक डे’ कॅम्पसाठी भोरमधील वैष्णवची निवड
भोर, ता. २९ : येथील भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयातील इयत्ता नववीमधील एनसीसीचा विद्यार्थी कॅडेट वैष्णव निवृत्ती खोपडे याची २६ जानेवारीला नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘रिपब्लिक डे’ कॅम्पसाठी निवड झाली आहे.
रिपब्लिक डे कॅम्प (आरडीसी) हा एनसीसीमधील हा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कॅम्प मानला जातो. यामध्ये देशभरातील हजारो कॅडेट प्रत्येक राज्याचे नेतृत्व करीत असतात. दिल्लीमध्ये दरवर्षी १ ते ३० जानेवारी दरम्यान हा कॅम्प आयोजित केला जातो. यामध्ये ड्रील व परेड प्रशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, पंतप्रधान भेट, राष्ट्रपती भेट, पॅरा मिलिटरी व लष्करी प्रात्यक्षिके यांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच २६ जानेवारीच्या मुख्य परेडमध्ये सहभाग असतो. प्रत्येक सहभागी कॅडेटला प्रमाणपत्र व राष्ट्रीय सन्मान चिन्ह दिले जाते. भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेश राजेशराजे पंतसचिव, अध्यक्ष प्रमोद गुजर, उपाध्यक्ष अॅड. मुकुंद तांबेकर, सचिव डॉ. सुरेश गोरेगावकर, संचालक सुरेश शाह, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अण्णासाहेब बिराजदार आदींसह मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे, उपमुख्याध्यापक वसंत गायकवाड, पर्यवेक्षिका नीलिमा मोरे, विश्वास निकम, विक्रम शिंदे, योगेश केंगले, केशव पवळे, सोमनाथ कुंभार, ज्ञानदेव शेडगे, दिलीप देशमुख आदींनी वैष्णवचे अभिनंदन केले. वैष्णव खोपडे याच्या निवडीमुळे राजा रघुनाथराव विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेश राजे पंतसचिव यांनी सांगितले.
6251

