मतदारांपर्यंत चिन्ह पोचवण्यासाठी अपक्ष उमेदवाराची होणार दमछाक
भोसरी, ता. १८ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाद्वारे अपक्ष उमेदवारांना तीन जानेवारीला निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असल्याने अपक्ष उमेदवाराला त्यांना मिळालेले चिन्ह मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी जेमतेम दहा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे सुमारे पन्नास हजार मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोचविण्यासाठी अपक्ष उमेदवारांची दमछाक होणार असल्याचे ‘चिन्ह’ आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांचे माजी नगरसेवक आणि पक्षांद्वारे आश्वासित करण्यात आलेले इच्छुक उमेदवार यांनी पक्षाच्या चिन्हाद्वारे प्रभागात प्रचारास सुरूवात केली आहे. त्याचप्रमाणे नोंदणीकृत राजकीय पक्षांद्वारे त्यांच्या पक्षाचे चिन्ह मतदार आणि नागरिकांत यापूर्वीच चांगल्या प्रकारे रुजविले आहे. त्यामुळे नोंदणीकृत पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या चिन्हांसह प्रभागात मतदारांशी संपर्क साधत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या उलट स्थिती पक्षाच्या तिकिटाची खात्री नसणाऱ्या उमेदवारांची आहे. कारण त्यांना निवडणूक रिंगणात उतरत असताना निवडणुकीचे चिन्हच नसल्याने मतदारांशी संपर्क साधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात सुमारे पन्नास हजार मतदार संख्या आहे. त्यामुळे नगरसेवकाची ही निवडणूक म्हणजे मिनी आमदारकीची निवडणूक असल्यासारखे आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना मतदारांपर्यंत पोचण्यासाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे उमेदवारांची मतदारांपर्यंत पोचण्याची लगीनघाई सुरू असल्याचे चित्र सर्वच प्रभागात पाहायला मिळते.
निवडणूक आयोगाद्वारे सर्वच उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, नोंदणीकृत पक्षाचा एबी अर्ज मिळविणाऱ्या उमेदवाराला पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला त्यांच्या चिन्हांची अगोदरच माहिती असणार आहे. मात्र अपक्ष उमेदवाराला कोणते चिन्ह निवडणूक आयोगाद्वारे देण्यात येईल याची खात्री नसल्याने प्रभागात कसा प्रचार करावा असा प्रश्न अपक्ष उमेदवारांपुढे असणार आहे.
दहा दिवसांचा अवधी
तीन जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप तर १५ जानेवारीला मतदान होणार असल्याने अपक्ष उमेदवाराला मतदारांपर्यंत चिन्ह घेऊन जाण्यासाठी जेमतेम दहा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. या दहा दिवसांत चिन्हांसह मतदारांपर्यंत पोचण्याचे दिव्य अपक्ष उमेदवाराला पार करावे लागणार आहे.
दमछाक होणार
महापालिकेच्या प्रभाग रचनेत भौगोलिक दृष्ट्या मोशी-चऱ्होली प्रभाग क्रमांक तीन त्याचप्रमाणे दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक चार क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहेत. अन्य काही प्रभागही क्षेत्रफळाच्या दृष्टीने इतर प्रभागाच्या तुलनेत मोठे आहेत. त्यामुळे क्षेत्रफळाने मोठ्या असणाऱ्या प्रभागात चिन्ह मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी अपक्ष उमेदवारांची दमछाक होणार असल्याचे ‘चिन्ह’ आहे.

