
बारामतीत ज्येष्ठाला बतावणी करत लुटले
बारामती, ता. १३ : ‘क्राईम ब्रॅंचचा पोलिस आहे, येथे काल चोरीचा प्रकार घडला आहे, तुम्ही गळ्यातील लॉकेट व हातातील अंगठी काढून रुमालामध्ये ठेवा,’ असे सांगत हातचलाखीने दोन तोळे वजनाचे ४० हजाराचे दागिने लंपास केल्याचा प्रकार बारामतीत घडला.
याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघा अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल गोविंद पोतेकर (वय ७०, रा. माउली बंगला, पूर्वा कॉर्नरशेजारी, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोतेकर हे कटिंगसाठी एका दुकानाकडे निघाले होते. या वेळी दुचाकीवरून एक इसम आला. त्याने कसले तरी ओळखपत्र दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने गळ्यातील सोन्याची साखळी व हातातील अंगठी, मोबाईल व पाकीट हे रुमालामध्ये बांधले. या वेळी तेथे अन्य एक अनोळखी आला. त्याने तेथे अगोदर उपस्थित असलेल्याला येथे झालेल्या चोरीचे काय झाले, असे म्हणत पोतेकर यांच्याकडील रुमाल दुचाकीवर ठेवला. नंतर त्यांना तो परत देत ते लागलीच तेथून पसार झाले. फिर्यादीने रुमाल उघडून बघितला असता त्यात मोबाईल व पाकीट होते. सोन्याची साखळी व अंगठी चोरीला गेल्याचे दिसून आले.