
नामवंत कंपनीचे बनावट स्पेअर पार्टविक्रीप्रकरणी बारामतीत गुन्हा
बारामती, ता. २ ः नामवंत कंपनीचे स्पेअर पार्ट असल्याचे भासवत बनावट स्पेअर पार्ट विकणाऱ्या अंबाराम जोगाजी भोगरा (रा. स्वयंभू अपार्टमेंट, बारामती) यांच्या विरोधात बारामती शहर पोलिसांनी कॉपीराइट अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.
याबाबत कंपनीकडून रेवननाथ विष्णू केकाण (रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली. ते स्पीड सर्च अॅण्ड सिक्युरीटी नेटवर्क प्रा. लि. चंदीगड या कंपनीत ऑपरेशन हेड आहेत. या कंपनीला मोटारसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया कंपनीच्या स्वामित्व हक्क रक्षणाचे अधिकार आहेत.
शहरातील कसब्यातील महादेव अॅटो सेंटर या दुकानात काही लोक स्वामित्व अधिकार असलेल्या नामवंत कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विकत असल्याची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांसह छापा टाकण्यात आला असता महादेव अॅटो सेंटर दुकानात नामवंत कंपनीच्या नावाचे बनावट एअर फिल्टर, क्लच प्लेट, मडगार्ड ब्रॅकेट, हॅनगर बुश रबर, हेड रिंग, फेशर प्लेट आदी साहित्य विकले जात असल्याचे निष्पन्न झाले.