आयबीएमच्या अभ्यासक्रमांचे दालन खुले

आयबीएमच्या अभ्यासक्रमांचे दालन खुले

बारामती, ता. १७ : पुढील काळात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, पदवीसोबतच कौशल्यावर आधारित शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे, ही बाब ओळखून आयबीएमने मुंबई व पुण्याप्रमाणेच बारामतीत आयबीएमच्या वतीने कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करीत असल्याची माहिती आयबीएमचे वरिष्ठ अधिकारी हरी रामसुब्रम्हण्यम यांनी दिली.

आयबीएमच्या अभ्यासक्रमांचे म्हणजेच इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशन (आईस) या उपक्रमाचे उद्‌घाटन तसेच विद्यार्थी व पालकांना आयबीएमच्या विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती देणे, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच्या करिअरच्या संधी याबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी (ता. १८) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी हरी रामसुब्रम्हण्यम बोलत होते.

या प्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, रजिस्ट्रार श्रीश कंभोज, आयबीएमचे रामसुब्रम्हण्यम हरी, विरुक्कीदीन सुर्की, रामनाथ शानबाग, श्रीनिवास रामानुजम उपस्थित होते.

विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांनी प्रास्ताविकात बारामती आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे हब करण्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे हे पहिले पाऊल असल्याचे नमूद केले.

हरी म्हणाले की, फक्त नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनण्यासाठी हे अभ्यासक्रम मदत करतील. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे ज्ञान असेल तर तुम्ही या पुढील काळात स्पर्धेत तग धरुन राहू शकाल. प्रशिक्षणासोबतच प्रकल्प व तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयबीएम करणार आहे. विविध तज्ज्ञ बारामतीत येऊन मार्गदर्शन करणार आहेत.

सुर्की म्हणाले की, पुणे मुंबईनंतरचा सर्वात इनोव्हेटिव्ह असा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर यात अधिक भर दिला जाईल. इंग्रजी येत नसेल तरी कौशल्य आत्मसात केल्यावर तुम्हाला काहीही अवघड नाही.

विद्या प्रतिष्ठान व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे काम पाहून आयबीएम, ऑक्सफर्ड, मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्स फाउंडेशन या संस्था आपणहून काम करण्यास पुढे आल्या, हे आपले यश आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या दूरदृष्टीचे हे फलित आहे. या संस्थांचा आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी फायदा करून घेणे गरजेचे आहे. आयबीएमच्या अभ्यासक्रमासाठी वित्तसहाय्य मिळेल का, नोकरीची हमी मिळेल का या दोन पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने नोकरी कमी होईल, ही भीती दूर करून हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याशिवाय आता गत्यंतर नाही.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह

जपान व जर्मनीत करिअरची संधी
जपान व जर्मनीमध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्याने या दोन्ही देशांनी भारतीय युवकांना करिअरची संधी देऊ केली आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर व जपानी भाषा येत असलेल्या पदवीधरांना या दोन्ही देशांमध्ये रोजगार व प्रसंगी नागरिकत्वही बहाल केले जाणार आहे. जपानी भाषा शिकविली जाणार असून प्रारंभी वीस विद्यार्थ्यांची यात निवड होणार आहे. काही लाख युवकांचे मनुष्यबळ या दोन्ही देशांना हवे असून या संधीचा लाभ युवकांनी घ्यायला हवा. या बाबत अधिक माहितीसाठी विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी सांगितले.

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या प्रयत्नांमुळे विद्या प्रतिष्ठानला आयबीएम यांनी हे अभ्यासक्रम उपलब्ध करून

दिले, याचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सामोरे जाताना मुलांना निश्चित फायदा होईल.
- ॲड. नीलिमा गुजर, सचिव


हे विद्यार्थी करू शकतात आयबीएमचे कोर्सेस
ज्यांचे अभ्यासक्रम बारावीनंतर तीन वर्षांचे आहेत, उदा. कला, विज्ञान व वाणिज्य शाखा...असे विद्यार्थी शेवटच्या दोन वर्षात हा कोर्स करू शकतात. कोणत्याही शाखेचे विद्यार्थी येथे ॲडमिशन घेऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी दिगंबर पडुळकर ९४२०१७२१७४, ९५४५६६८६७९ किंवा राजकुमार पांचाळ ८६००८८१८६६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

07801

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com