राष्ट्रवादीचे अनेक आमदार 
परत येतील : रोहित पवार

राष्ट्रवादीचे अनेक आमदार परत येतील : रोहित पवार

बारामती, ता. ७ : ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे काही आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, येत्या काही दिवसांत काहीतरी घडलेले तुम्हाला दिसेल, ही फक्त चर्चा राहणार नाही, काही गोष्टी घडताना दिसेल. काही ठिकाणी आम्ही नवीन उमेदवार तयार करत आहोत, जर त्या भागातील आमदारांनी यायला उशीर केला आणि तिथे जर नवीन चेहरे पुढे आणले, तर येणाऱ्या आमदाराला अडचण होईल,’’ अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या पक्षात काही आमदार प्रवेश करण्याच्या शक्यतांना दुजोरा दिला.
‘‘साहेबांनी पक्षात आमदारांना घेताना पहिले प्राधान्य निष्ठावंतांना द्यावे, ज्यांनी साहेबांना विरोध केला, त्यांच्या विरोधात बोलले, अशांना पक्षात पुन्हा सामावून घेऊ नये, असे एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना सांगू शकतो,’’ असेही रोहित पवार म्हणाले.
बारामतीत विधानसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना होणार का? असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, ‘‘पवारसाहेब तिकीट देणार आहेत, पण एक कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जी जबाबदारी दिली जाईल, ती पूर्णपणे पार पडेल.’’

निवडणुकीनंतरही दडपशाही
सुपे परिसरातील पाण्याचा प्रश्न संपविण्यासाठी स्वतः शरद पवार बैठक घेणार आहेत. आजही खासदार सुप्रिया सुळे तिकडे बैठक घेणार होत्या, पण तिथे त्या बैठकीला जाऊ नका, असे निरोप दिले जात आहेत. निवडणूक संपल्यावरही ही दडपशाही सुरु आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

बारामतीत जनसंपर्क कार्यालय
बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये शुक्रवारी (ता. ७) रोहित पवार यांनी जनसंपर्क कार्यालय सुरु केले. त्यानंतर माध्यमांनी त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, संपर्क साधणे सोपे व्हावे, या उद्देशाने बारामतीत संपर्क कार्यालय सुरु केलेले आहे. अनेकदा लोकांना आमदाराच्या पत्रांची आवश्यकता असते. अनेक युवकांनी मला तसे सांगितले. तसेच, माझ्या आजोबांचे म्हणजेच स्व. अप्पासाहेब पवार यांचे हे कार्यालय सुरु करण्याची इच्छा होती. त्यामुळे संपर्क कार्यालय सुरु केले. इथे कोणताही बोर्ड लावलेला नाही, छोट्या मोठ्या अडचणी येथून सुटणार असतील तर त्याला काही हरकत नसावी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com