बारामतीत गुलाब पाण्याच्या तुषारांनी वारकऱ्यांचे स्वागत

बारामतीत गुलाब पाण्याच्या तुषारांनी वारकऱ्यांचे स्वागत

Published on

बारामती, ता. ६ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी बारामती नगरपालिकेने आज गुलाबपाणी फवारून वातावरण सुगंधित केले होते. थोड्याथोड्या वेळाने गुलाबपाणी देशमुख चौकाच्या आसपास फवारले जात होते. त्या मुळे वातावरण प्रफुल्लित झालेले होते.
ठिकठिकाणी नगरपालिकेने पुठ्ठयाचे बॉक्स ठेवलेले होते, सर्व प्रकारचा कचरा या बॉक्समध्ये टाकण्यासाठी आवाहन केले जात होते. स्वच्छतादूत तातडीने रस्त्यावर पडलेले कव्हर्स, केळीच्या साली, कागदे तसेच इतर साहित्य साफ करत होते. बारामती नगरपालिकेने यंदाही बारामती सजग नागरिक मंचाच्या मदतीने शहरात १२०० फिरती शौचालये बसविलेली होती. त्याचा नकाशा प्रमुख ठिकाणी लावण्यात आला होता. त्या मुळे महिलांची मोठी सोय झाली.
अनेक कुटुंबांनी कोणताही गाजावाजा न करता त्यांच्या परीने शक्य होईल तशी विविध स्वरूपात वारक-यांना मदत केली. विविध सामाजिक आणि सेवाभावी संघटनांनीही वारकऱ्यांना मदतीसाठी स्टॉल्स लावले होते. जागोजागी वारकऱ्यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावले होते.
वरुणराजा बरसला तरी पालखी सोहळा अगदी वेळेवर शारदा प्रांगणात विसावला. नगरपालिकेने सुसज्ज मंडप उभारलेला असल्याने वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. शारदा प्रांगणात आरतीनंतर पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी बारामती आणि पंचक्रोशीतून आलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती.
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी (ता. ७) पालखी सोहळ्याचे स्वागत करणार आहेत. अजित पवार मोतीबाग ते काटेवाडीपर्यंत पालखी सोहळ्यासोबत चालत जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.