बारामतीकरांचा प्रशासनावर दबाव कायमच

बारामतीकरांचा प्रशासनावर दबाव कायमच

Published on

बारामती, ता. २ : शहरात रविवारी (ता. २७ जुलै) खंडोबानगर चौकात झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर नागरिकांचा प्रशासनावरचा दबाव कायमच आहे. नागरिकांच्या सूचनांचा पाऊस पडत असल्याने अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
घटना घडल्यानंतर दोन तीन दिवसानंतर वातावरण थंड होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात नागरिकांनी दररोज पाठपुरावा करत हा दबाव कायम ठेवला आहे. शहरातील नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, आरटीओ अशा विविध विभागांच्या कारभाराविषयी नागरिकांच्या तक्रारी आहेत. अपघातमुक्त बारामती या व्हॉटसॲप ग्रुपवर समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक एकवटले आहेत. यात आता विविध विभागांचे अधिकारीही सहभागी झाल्यामुळे त्या त्या विभागाच्या तक्रारींची दखल घेणे, अधिकाऱ्यांना भाग पडत आहे.
दरम्यान, काही विशिष्ट विभागांचे अधिकारी अजूनही नागरिकांच्या तक्रारींना फारसे गांभीर्याने घेत नसल्याने, तक्रारींना प्रतिसादच दिला जात नसल्याने लोक संतप्त आहेत. अनेक अधिकारी फोनच उचलत नाही, ही प्रमुख तक्रार आहे. काही अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात, प्रश्न सोडविण्यापेक्षाही टाळाटाळ करण्यात काही जण आघाडीवर असल्याच्याही तक्रारी आहेत. ठराविक अधिकारी तातडीने दखल घेत केलेल्या कामाचे फोटो टाकत असल्याने अशा अधिकाऱ्यांविषयी लोकांकडून आदर व्यक्त केला जात आहे.

समन्वयाचा अभाव
हद्दीचा वाद, जबाबदारी परस्परांवर ढकलणे, तांत्रिक बाबी पुढे करणे, कारणे सांगून वेळ मारून नेणे यातच अनेक अधिकारी धन्यता मानत आहेत. शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून होणाऱ्या तक्रारींची शहानिशा करून त्या प्रत्येक तक्रारीला उत्तर देत कार्यवाहीची माहिती दिली गेली तर नागरिकही सहकार्य करतात, असे असताना समन्वयाची भूमिका घेतली जात नसल्याची लोकांच्या तक्रार आहे.

सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सूचनांची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही त्रुटी असतील तर त्याही दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी, बारामती.

नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांची शहानिशा करून योग्य तेथे तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे. टप्प्याटप्प्याने काही बदल केले जातील, नागरिकांच्या सूचनांचे स्वागत आहे.
- चंद्रशेखर यादव, पोलिस निरिक्षक, वाहतूक शाखा, बारामती.

Marathi News Esakal
www.esakal.com