
बारामती, ता. २ : बारामती शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. नियोजन नसल्याने वाहनचालक जागा मिळेल तिथे वाहने लावत असल्याने वाहतुकीलादेखील अडथळा ठरत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नियोजन करून ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेल्या तीन दशकात शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वेगाने वाढली. व्यक्ती तितक्या दुचाकी अशी आजची जवळपास स्थिती आहे. चारचाकी व इतर वाहनांचीही संख्या लक्षणीय वाढली आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढली मात्र पार्किंगची समस्या कायमच आहे. बहुसंख्य वेळा रस्त्यात जागे मिळेल तिथे वाहन लावण्यात येते. याचा नाहक मनस्ताप इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरात सार्वजनिक वाहनतळ व इतर पर्याय नसल्याने दिसेल जागा उपलब्ध होईल तिथे वाहन लावावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, वाहनतळ उपलब्ध झाल्यास वाहने लावणे सोयीचे होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
रस्त्यांची रुंदी वाढवली तरी शहरातील वाहनांची संख्याच इतकी झाली आहे की रस्तेही अपुरे पडत आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत तसेच शाळा सुटताना व भरताना प्रचंड गर्दी होते. तालुक्याचे ठिकाण असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यानेही पार्किंगची समस्या वाढू लागली आहे. नव्याने उभारलेल्या विविध संकुलांना परवानगी देताना नगर परिषदेने पार्किंगची सुविधा विचारात न घेता परवानगी दिलेली आहे. परिणामी, या संकुलातील वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. शहरातील सेवा रस्ते पार्किंग हब बनले आहेत. अनेक रस्त्यांवर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे बारामतीकर त्रस्त झाले आहेत.
काय आहेत नागरिकांच्या अपेक्षा
- वर्दळीच्या ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ करणे
- दुचाकी आणि चारचाकी वाहनतळ तयार करणे.
- चुकीचे पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.
- नगर परिषद, पोलिस यांनी एकत्रित प्रयत्न करणे.
- काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक करणे.
- रिकाम्या जागांवर पार्किंगसाठी सुविधा तयार करणे.
पार्किंगची समस्या काही भागात जटिल आहे. याबाबत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून यात काय मार्ग काढता येतो त्याबाबत संबंधितांशी बोलून प्रयत्न करण्यात येतील.
- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, बारामती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.