बारामती नगरपरिषद नेमके करते तरी काय?
बारामती, ता. २४ : नवरात्र असूनही शहरातील माळावरच्या देवीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे न बुजविणे असो किंवा शारदा प्रांगणातून नगरपरिषदेच्याच शाळेकडे जाणाऱ्या मैदानावर चिखलाचे साम्राज्य झालेले असो, रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे असो किंवा नागरिकांना पाण्यात बसून आंदोलनाची वेळ असो, बारामती नगरपरिषद नेमके काय करते आहे, असा प्रश्न बारामतीकरांपुढे आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमण त्याने होणारी वाहतुकीची कोंडी, पदपथांवर झालेले अतिक्रमण व लोकांना नाइलाजाने रस्त्यावरून चालायला लागते, अनेक ठिकाणी कागदावर दाखविलेले पार्किंगच गायब असतानाही कारवाई तर दूर पण साधी तपासणीही केली जात नाही. मंडईच्या पार्किंगचा नागरिकांना फारसा फायदा होतच नाही, या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषद प्रशासन नेमके काय करते आहे, असा प्रश्न चर्चिला जात आहे. दरवर्षी नवरात्रामध्ये माळावरच्या देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. बारामतीतून तीन हत्ती चौकमार्गे परकाळे बंगला पुलावरून लोक देवीला जातात. परकाळे बंगला पूल परिसरात रस्त्याची चाळण होऊनही नगरपालिकेने डागडुजीचे कष्ट घेतले नाहीत. शारदा प्रांगणावर चिखलाचे साम्राज्य असून त्यातूनच विद्यार्थ्यांना शाळेत चिखल तुडवत जावे लागते, मात्र तरीही या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नगरपालिकेने काहीही केलेले नाही. अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते, अतिक्रमणविरोधी पथक नेमके काय करते या बाबतही नागरिकांत चर्चा आहे. नागरिकांना दिलासा देणारे निर्णय प्रशासनाकडून व्हावेत अशी बारामतीकरांची अपेक्षा आहे.