वाढीव घरपट्टीवाढीबद्दल बारामतीकर नाराज

वाढीव घरपट्टीवाढीबद्दल बारामतीकर नाराज

Published on

बारामती, ता. २५ : वाढीव घरपट्टीचे आकडे पाहून डोळे पांढरे झालेल्या वाढीव हद्दीतील बारामतीकरांनी बुधवारी (ता. २४) नगरपरिषदेत धाव घेत वाढीव घरपट्टीवर हरकत नोंदविली. पूर्वीची घरपट्टी व नवीन यामध्ये असलेली मोठी तफावत अनेकांना अस्वस्थ करून गेल्याने नागरिकांमध्ये वाढीव घरपट्टीबाबत कमालीची नाराजी आहे.
याबाबत मुख्याधिकारी पंकज भुसे, नगररचनाकार दत्तात्रेय तरवडे, सहायक नगररचनाकार रणजितसिंह तनपुरे, घरपट्टी विभागप्रमुख अविनाश काळाणे यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
एका नागरिकाला मागील घरपट्टीची रक्कम २३०० रुपये होती, ती आता थेट १३७६४ रुपये इतकी आकारण्याचा निर्णय घेत तशा नोटीस पाठविल्याने संबंधिताचे धाबे दणाणले आहे. ही वाढ अन्यायकारक असून, अनेकांनी उत्पन्न कमी व घरपट्टी अधिक अशी स्थिती निर्माण झाल्याची तक्रार केली आहे. वार्षिक उत्पन्नावर तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत घरपट्टी आकारली जात असल्याचे काहींनी सांगितले.
बारामती नगरपरिषदेच्या आवारात वाढीव घरपट्टीवर ज्यांचे आक्षेप होते त्यांचे म्हणणे ऐकून घेत प्रशासनाने सुनावणी घेतली. यात अनेक नागरिकांनी घरपट्टीची रक्कम अवाच्या सव्वा आकारल्याच्या तक्रारी करत ही घरपट्टी मान्य नसल्याचे नमूद करत आक्षेप घेतला.
सदनिका, गाळा, सभागृह किंवा इमारत विकत घेऊन ती भाडेतत्त्वावर दिल्यास मालकाला जबर घरपट्टी बसणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कर भरण्याची जबाबदारी मालकाकडे असेल, तर त्याला हा फटका सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपयोगकर्ता मूल्याबाबतही आक्षेप
पानपट्टी असली किंवा मॉल असला तरी दोन्ही आस्थापनांना ९६० रुपये, तर पत्र्याची खोली असो किंवा चार खोल्यांची सदनिका असो त्यांना प्रत्येकी ४८० रुपये कर आकारणी केली जाते. छोटी दुकाने व सदनिकांसाठी ही रक्कम अन्यायकारक असून, क्षेत्रफळानुसार यात बदल होणे गरजेचे असल्याचे बारामतीकरांचे म्हणणे आहे. माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्र लिहून यात बदल करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com