कार्यालयीन वेळेत अधिकारीच गायब

कार्यालयीन वेळेत अधिकारीच गायब

Published on

बारामती, ता. २६ : येथील विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जागेवर सापडत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. कोणतीही व कसलीही पूर्वसूचना न देता कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत उपस्थित न राहणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत.
सरकारी कार्यालयांसाठी आता पाच दिवसांचाच आठवडा आहे. शनिवार व रविवारी सुट्टी असते. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसातच लोकांना कामे मार्गी लावावी लागतात. यातही शासकीय कार्यालय सुरू होण्याच्या वेळेनंतर अनेकजण येतात, तर बंद होण्याच्या अर्धातास अगोदरपासूनच घरी जाण्याची अनेकांची तयारी सुरू असते, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
कार्यालयीन वेळेत कर्मचारी व अधिकारी जागेवर नसतील तर ते नेमके कोठे गेले आहेत, कशासाठी गेले, कधी परत येणार याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांना अनेकदा नसते. येणाऱ्या अभ्यागतांना ही माहिती देण्यात त्यांना फारसे स्वारस्यही नसते. नाईलाजाने कामासाठी येणाऱ्यांना हेलपाटा मारावा लागतो. लोकांचा वेळ यात खर्च होतो, त्याची फिकीर सरकारी बाबूंना अजिबातच नसते.
प्रत्येक कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या नावाचा फलक लावून ते सोमवार ते शुक्रवार या वेळेत केव्हा उपलब्ध असतील, याची माहिती त्यांच्या मोबाईल क्रमांकासह देणे आवश्यक असल्याचे बारामतीकरांचे म्हणणे आहे.

ओळखपत्राविनाच वावरतात कर्मचारी
बहुसंख्य शासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारीही ओळखपत्रच वापरत नसल्याने ते नेमके कर्मचारी आहेत की नागरिक हेच समजत नाही. या बाबत अनेकदा सूचना देऊनही अनेक कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. वरिष्ठांवरच कारवाईचा बडगा उगारला तरच कर्मचारी ओळखपत्र वापरतील, असेही लोकांचे म्हणणे आहे.

कोणी काहीही म्हणाले तरी एका भेटीत कधीच काम होतच नाही. हेलपाटे मारल्याशिवाय शासकीय कामच होत नाही. तक्रारी केल्या तर कामे रखडवली जातात. त्यामुळे नाईलाजाने काम करून घेण्यास प्राधान्य द्यावे लागते.
- दीपक कुंभार, नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com