बारामतीत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार उद्या ठरणार

बारामतीत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार उद्या ठरणार

Published on

बारामती, ता. ११ : राष्ट्रवादीच्या इच्छुक नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठी गुरुवारी (ता. १३) मुलाखती घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी जय पवार हे उमेदवार नसतील, ते निवडणूक लढविणार नाही, असा खुलासा करत या विषयावर अजित पवार यांनी पडदा पाडला आहे.

बारामती येथे अजित पवार म्हणाले की, नगरपरिषदेसाठी इच्छुकांनी भेट घेतली आहे. मात्र, गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या इच्छुंकाशी संवाद साधून मेळावा घेणार आहे. ज्या इच्छुकांना राष्ट्रवादीसोबत यायची इच्छा आहे त्यांनी गुरुवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू नयेत. सर्वांशी चर्चा करून मगच निर्णय घेऊ.

महायुती म्हणून एकत्र लढले तर मतविभागणी होणार नाही, असा विचार आहे, या बाबत प्रत्येक ठिकाणी पक्षाची ताकद विचारात घेत या बाबत निर्णय घेतला जाईल. मेडद येथील खरेदी विक्री संघाच्या जागेसंदर्भात केले गेलेल्या आरोपात तथ्य नसून ते नियमानुसारच झालेले आहेत.

चुकीचे काही घडले असेल तर त्याचे पुरावे आणावेत, त्याप्रकरणी चौकशी व्हायला हवी व त्यातून सत्य काय ते बाहेर यायला हवे. दरम्यान येत्या दोन तीन दिवसात राज्यस्तरीय निवडणुकीसंदर्भात जबाबदारीचे वाटप केले जाईल.

निवडणूका आल्या की आरोप
या पूर्वीही निवडणूका आल्या की आमच्या पक्षावर हल्ले केले जातात. बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याने इतकी वर्षे पारदर्शकता ठेवून मी काम केलेले आहे. चुकीच्या गोष्टी होऊ दिल्या नाहीत व देणारही नाही. या पुढील काळात माझे नातेवाइक, जवळची लोक किंवा कार्यकर्ते यांनी नियमाबाह्य काम सांगितले तर ते अधिकाऱ्यांनी करू नये, असे निर्देश दिलेले आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com