बारामतीच्या युवकांचा वाळवंटात विक्रम
बारामती, ता. १३ : येथील जिगरबाज युवकांनी क्षमतेचा कस लावणाऱ्या राजस्थानमधील बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉन - द हेल रेस यशस्वीपणे पूर्ण केली.
जैसलमेर ते लोंगेवालाच्या दरम्यान दिवसा ऊन, संध्याकाळी वारा व रात्री गोठवणारी थंडी अशा वातावरणात बारामतीचे दादासाहेब सत्रे, केतनकुमार माने, प्रशांत शिर्के, राहुल शिर्के, राहुल चौधर, अनिस कोलंबोवाला, किशोर नलवडे, महेंद्र गोंडे यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. थरच्या वाळवंटात १०० किमी अंतराची ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. जैसलमेर ते लोंगेवालाच्या दरम्यान शारीरिक व मानसिक क्षमतांचा कस लावणारी अशी ही स्पर्धा असते. ४ डिसेंबर १९७१ ला याच वाळवंटात जैसलमेर जवळच्या लोंगेवाला चौकीवर पराक्रमाची गाथा लिहिली गेली. पाकिस्तानच्या शेकडो रणगाड्यांनी लोंगेवाला चौकीवर हल्ला केला. भारतीय शूर १२० जवानांनी पाकिस्तानच्या जवानांना उत्तर देत विजयी पताका फडकवली. धैर्य आणि बलिदानाची व्याख्या ठरलेल्या या रणभूमीला सलाम करण्यासाठी, या ऐतिहासिक संघर्षाची आठवण म्हणून स्पर्धेचे आयोजन केले जाते. दिवसभर तळपते ऊन, रात्री हाडे गोठवणारी थंडी अशा विरोधाभासी वातावरणात टिकून राहून स्पर्धा पूर्ण करणे आव्हानात्मक असते. प्रत्येक दहा किलोमीटर नंतर हायड्रेशन पॉइंट उपलब्ध असतो. त्यामुळे आपले पाणी, खाण्याचे साहित्य हे स्वतःजवळ बॅगेत ठेवून तुम्हाला दहा किलोमीटर अंतर अंगावरील वजनासह पूर्ण करावे लागते. कोणत्याही प्रकारे तुम्ही बाहेरील लोकांची मदत घेऊ शकत नाही, मदत घेतली तर स्पर्धेतून बाहेर जावे लागते.
दादासाहेब सत्रेंनी पटकावले चौथे स्थान
दादासाहेब सत्रे यांनी १० तास २५ मिनिटांमध्ये स्पर्धा पूर्ण करून संपूर्ण धावकांमध्ये चौथे स्थान पटकावले. केतनकुमार माने, प्रशांत शिर्के, राहुल शिर्के यांनी १२ तास ५५ मिनिटांमध्ये, तर राहुल चौधर यांनी १४ तास ३४ मिनिटांमध्ये पूर्ण केली. अनिस कोलंबोवाला, किशोर नलवडे, महेंद्र गोंडे यांनी ५० किलोमीटरची स्पर्धा ७ तास २१ मिनिटांमध्ये पूर्ण केली. दादासाहेब सत्रे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
4059
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

