पुण्यात मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर
बारामती, ता. २४ : भारतीय जैन संघटना, पुण्यातील संचेती हॉस्पिटल व चांदमल मुनोत ट्रस्टच्या वतीने ३ ते ५ जानेवारी दरम्यान ३२ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर संचेती हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. डॉ. पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा व मुनोत ट्रस्टचे हस्तिमल मुनोत यांनी ही माहिती दिली.
जगप्रसिद्ध शल्यविशारद डॉ. शरदकुमार दीक्षित यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भारतातील विविध शहरात अशा शिबिरांचे आयोजन केले होते. अमेरिकेत वास्तव्यास असूनही त्यांनी भारतातील हजारो लोकांना प्लॅस्टिक सर्जरीच्या माध्यमातून नवीन जीवन देऊ केले होते. डॉ. दीक्षित यांचेच अमेरिकेतील शिष्य डॉ. लॅरी वेइंस्टन व त्यांच्या सहा सहकार्यांनी दीक्षित यांच्या पश्चात हा उपक्रम गेल्या नऊ वर्षांपासून पुढे सुरू ठेवला आहे. दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील व्रण व डाग, नाक व कान यातील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, चिकटलेली हाताची बोटे, फुगलेले गाल आदी सामान्यांच्या आवाक्याबाहेरील महागड्या शस्त्रक्रिया या शिबिरात विनामूल्य केल्या जाणार आहेत. शिबिर तीन दिवस चालणार असले तरी रुग्णांची नावनोंदणी व तपासणी फक्त शनिवारी (ता. ३ जानेवारी) सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत होणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विजय पारख ९८२२४२४३१६ किंवा नितीन शहा ९६०४९१३२९६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामतीचे अध्यक्ष सम्यक आनंद छाजेड यांनी केले आहे.

