बारामतीत खंडणीसाठी हॉटेलचालकास मारहाण
बारामती, ता. २७ : शहरातील प्रगतीनगर येथील आपले चायनीज हॉटेलवर आठ जणांनी खंडणीसाठी हल्ला केला व हॉटेलमालकास जबर मारहाण केली. कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न चुकल्याने पुढील अनर्थ टळला.
घटनेचे गांभीर्य ओळखून बारामती शहर पोलिसांनी तातडीने पावले उचलून आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी दिली. प्रगतीनगर परिसरातील हॉटेलवर शुक्रवारी (ता. २६) आठ जणांच्या टोळक्याने हल्ला करत मालकास जबर मारहाण केली. याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने याची दखल घेत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी आकाश सिद्धनाथ काळे (वय २९, रा. देसाई इस्टेट, बारामती) यांनी फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी विनायक मारक (मारंबी), राहुल चव्हाण, राज गावडे, आदित्य बगाडे, निहाल जाधव व अनोळखी (पूर्ण नावे नाहीत) अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बारामतीत दहशत माजविण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरिक्षक चिवडशेट्टी यांनी दिला आहे.
मिलिंद संगई, बारामती.

