बारामती निशब्द...

बारामती निशब्द...

Published on

बारामती नि:शब्द...
बारामती, ता. २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाल्याची बातमी बारामतीकरांना समजल्यानंतर काही क्षण बारामतीकरांचा या बातमीवर विश्‍वासच बसत नव्हता. ‘अजित पवार यांच्या कारकिर्दीला नियतीची दृष्ट लागली आणि बारामती पोरकी झाली’ अशा शब्दात बारामतीकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्या ठिकाणी विमान अपघात झाला त्या ठिकाणी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नागरिकांनी धाव घेत
या बातमीची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला. बातमी खरी असल्याचे समजल्यानंतर अक्षरश: जीवाचा आकांत करत आपला नेता असा अचानक निघून गेल्याचे दु:ख नागरिकांनी व्यक्त केले. पचवता न येणारे दु:ख कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडून व्यक्त केले. दादा आपल्यात नाहीत ही भावना अस्वस्थ करून सोडणारी होती.
अडचण आणि संकटाच्या काळात एखाद्या मोठ्या भावासारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आपला थोरला भाऊ आपल्यातून निघून गेल्याची जाणीव बारामतीकरांना होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘मी कामाचा माणूस आहे’ असे प्रत्येक भाषणांमध्ये नमूद करणारे अजित पवार आज अगदी अचानकपणे आपल्यातून निघून गेले ही भावना बारामतीकरांच्या पचनी पडत नव्हती. मन हेलावणाऱ्या बातमीने बारमतीकरांनी शहर पूर्णपणे बंद करत पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली.
बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामती तालुक्यात सभा घेणार होते. त्यासाठी ते मुंबईहून बारामतीला विमानाने निघाले होते. मात्र नि:शब्द सभा पाहण्याची वेळ बारामतीकरांवर आल्याच्या भावना नागरिकांच्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com