कामाचा माणूस हरपला
बारामती, ता. २८ ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता. २८) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामतीच्या विकासाची चर्चा केवळ महाराष्ट्र नव्हे, तर पूर्ण देशभरामध्ये होते. पवार यांनी केलेल्या सर्वांगीण विकासाचे बारामती मॉडेल सर्वांच्या स्मरणात कायम राहणारे आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक नकाशावर बारामतीचे स्थान केवळ एका तालुक्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ‘बारामती मॉडेल’ म्हणून ओळखली जाणारी विकासाची संकल्पना आज देशपातळीवर अभ्यासाचा विषय ठरली आहे. या सर्वांगीण विकास प्रक्रियेची मुहूर्तमेढ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रोवली आणि त्या संकल्पनेला अधिक व्यापक, गतिमान व परिणामकारक स्वरूप देण्याचे काम उपमुख्यमंत्री व बारामतीचे लोकप्रतिनिधी अजित पवार यांनी सातत्याने केले.
गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळात पवार यांनी बारामतीच्या विकासाला केवळ राजकीय घोषणांपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष कृतीतून आकार दिला. शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, उद्योग, क्रीडा आणि संस्कृती अशा प्रत्येक क्षेत्रात बारामतीने केलेली प्रगती ही त्यांच्या नेतृत्वाची ठळक साक्ष आहे. एखाद्या कामाची संकल्पना मनामध्ये आल्यानंतर त्या कामाला प्रत्यक्षात उतरवण्यापर्यंत सर्व बाबी अजित पवार स्वतः पुढाकार घेऊन करीत. इमारतीचा आराखडा तयार करण्यापासून ते इमारतीची रंगसंगती व फर्निचरचे काम देखील ते स्वतः जातीने पाहत. त्यामुळे बारामतीतील सर्व इमारती या अत्यंत सुंदर व सुबक झाल्या आहेत. या सर्व इमारतींवर पवार यांच्या कामाची छाप ठळकपणे दिसून येते.
काम करताना पुढील २५ वर्षांचा विचार नजरेसमोर ठेवून अजित पवार कायम काम करीत राहिले. त्यामुळे बारामतीच्या झालेल्या सर्व शासकीय इमारती या पुढील २५ वर्षांत बारामतीकरांच्या दृष्टीने पुरेशा ठरणाऱ्या असतील. विविध कामांच्या निमित्ताने राज्यात, देशात व परदेशात फिरत असताना जे काही चांगले असेल, ते माझ्या बारामतीसाठी व्हायला हवे, असा त्यांचा कायम आग्रह असायचा व त्यातूनच बारामतीतील अनेक इमारती व प्रकल्प अजित पवार यांनी उभे केले.
निवडणुका असोत वा नसोत प्रत्येक वेळेस विकास हा केंद्रबिंदू मानून पवार यांनी आपल्या समाजकारण व राजकारणाची दिशा निश्चित केली होती. याच दिशेने ते शेवटच्या क्षणापर्यंत चालत राहिले. दोन्ही राष्ट्रवादी ज्या वेळेस वेगळ्या झाल्या त्या वेळेस देखील आपण घेतलेली भूमिका ही बारामतीच्या सर्वांगीण विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेली आहे, सत्तेसोबत राहिले तरच विकास वेगाने होऊ शकेल, यावर आपला विश्वास आहे, असे अजित पवार यांनी सांगितले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्याचे दुःख त्यांना कायमच होते. मात्र, तरीही त्यावेळेस विकास हा एकमेव मुद्दा नजरेसमोर ठेवून त्यांनी वेगळी भूमिका घेतली व त्या भूमिकेवर ते कायम ठाम राहिले.
बारामती मॉडेल म्हणून ज्याची देशभर चर्चा झाली, अशा बारामतीचा सर्वांगीण विकास करताना अजित पवार यांनी कायम मोठी किंमत मोजली. अनेकदा त्यांना वैयक्तिक स्वरूपात वाईटपणा आला. काही वेळेस मतांच्या माध्यमातून त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. मात्र, तरीही जेथे विकासाचा विषय येत होता तिथे त्यांची भूमिका खंबीर असे.
कृषी व जलसिंचन
बारामती तालुका हा मुळातच दुष्काळी पट्ट्यात मोडणारा. मात्र, जलसिंचन प्रकल्प, कालवे, पाणी नियोजन आणि आधुनिक शेती पद्धतींच्या माध्यमातून शेतीला स्थैर्य देण्याचे काम झाले. नीरा डावा कालवा, जनाई- शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा जलसिंचन योजना, मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, तसेच सूक्ष्म सिंचन योजनांचा प्रभावी वापर, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले. ऊस, द्राक्षे, भाजीपाला, फळबागा अशा विविध पिकामुळे बारामतीची शेती बहुपीक पद्धतीकडे वळली. अजित पवार यांचे सिंचनामधील योगदान हे बारामती तालुक्याच्या दृष्टीने वादातीत होते.
सहकार क्षेत्राला बळ
शेतकऱ्यांचे आर्थिक बळ असलेला सहकार हा बारामतीच्या
विकासाचा कणा राहिला आहे. साखर कारखाने, दूध संघ, पतसंस्था, बँका यामधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळाली. शेतकऱ्यांना बाजारपेठ, दर आणि प्रक्रिया उद्योगाशी जोडण्याचे धोरणात्मक निर्णय घेतले गेले. सहकारातून रोजगारनिर्मिती झाली आणि स्थलांतराचे प्रमाण कमी झाले. अजित पवार यांनी जाणीवपूर्वक सहकार क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला गती मिळाली होती.
एज्युकेशन हब म्हणून बारामतीची ओळख
ग्रामीण भागातील गुणवत्तेचा दीपस्तंभ म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. विद्या प्रतिष्ठान, शारदानगर शैक्षणिक संकुल, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यासह सर्वच शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी गेल्या साडेतीन वर्षात अजित पवार यांनी जे योगदान दिले, त्यामुळे बारामतीची ओळख एज्युकेशन हब म्हणून निर्माण झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच आयुर्वेदिक महाविद्यालय यामुळे देखील बारामतीमध्येच विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण प्राप्त होऊ लागले आहे. कृषी महाविद्यालय, अभियांत्रिकी, फार्मसी, आयटी, व्यवस्थापन, शाळा व निवासी संकुले यांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागली नाही. आज बारामतीतील विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. ही या शैक्षणिक गुंतवणुकीची फलश्रुती आहे. आज बारामती परिसरात एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, बारामतीच्या अर्थकारणाला शैक्षणिक सुविधांमुळे गती मिळाली आहे आणि याचे श्रेय अजित पवार यांना द्यावे लागेल.
सर्वसामान्यांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा
ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे हे मोठे आव्हान असते. मात्र, बारामतीत सुपर स्पेशालिटी रुग्णालये, मातृ-शिशू आरोग्य केंद्रे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता निर्माण झाली. यामुळे आजूबाजूच्या तालुक्यांतील रुग्णही उपचारासाठी बारामतीकडे येतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतः अजित पवार यांनी जातीने लक्ष घालून गरजू व अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना शासकीय दरात सिटीस्कॅन, एमआरआय यासह इतर सुविधा मिळाव्यात, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.
उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण केल्या
शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, ही बाब ओळखून अजित पवार यांनी उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा दिल्या साडेतीन दशकांमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केला. अन्न प्रक्रिया उद्योग, टेक्स्टाईल पार्क तसेच इतर उत्पादनक्षम कारखाने बारामती एमआयडीसीत यावेत, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असत. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती झाली. शिक्षण आणि उद्योग यांचा मेळ साधत कौशल्याधारित रोजगाराची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली.
खेळाला सातत्याने प्रोत्साहन दिले
राजकीय जीवनात आल्यापासूनच अजित पवार यांनी सुरुवातीपासूनच खो- खो कुस्ती कबड्डी यासह इतरही खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली होती. क्रीडा संकुले, जलतरण तलाव, अॅथलेटिक्स ट्रॅक, तसेच सांस्कृतिक सभागृहे, नाट्यगृहे, महोत्सव यामुळे युवकांना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सर्वांगीण विकासाच्या संधी मिळाल्या. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बारामतीतून घडले, ही अभिमानाची बाब आहे.
प्रशासनातील शिस्त आणि निर्णयक्षम नेतृत्व
अजित पवार यांची ओळख जलद निर्णय, कामाचा वेग आणि अंमलबजावणी यासाठी होती. निधी मंजुरीपासून ते प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंतचा पाठपुरावा हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य मानले गेले. त्यामुळेच अनेक विकासकामे कागदावर न राहता प्रत्यक्ष दिसून आली. अजित पवार यांच्या अकाली जाण्यामुळे आता या विकासाबाबतच्या त्यांच्या आठवणी फक्त शिल्लक राहिल्याची शोकाकूल प्रतिक्रिया बारामतीकरांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

