

बारामती, ता. २३ : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता. २३) झालेल्या मतदानानंतर बारामतीत ५८.२७ टक्के मतदानाची नोंद झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांनी दिली. या मतदानामध्ये ३,८४,५७९ मतदारांपैकी २,२४,०८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानास सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग अत्यंत संथ होता. त्यानंतरच्या दोन तासांत त्यात थोडी वाढ झाली. दुपारच्या सत्रात उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम मतदानावर जाणवला, दुपारी चारनंतर पुन्हा मतदान प्रक्रियेने वेग घेतला.
प्रशासनाच्या वतीने सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आल्याने मतदान प्रक्रियेत कोणताही गोंधळ झाला नाही. मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र बदलले असणे, मतदार यादीतील क्रमांक न सापडणे अशा बाबी बहुसंख्य बूथवर घडल्या. यामुळे मतदारांना मनस्तापालाही सामोरे जावे लागले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वच राजकीय पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्यासमोर कोणीही तुल्यबळ उमेदवार नव्हता. मुख्यमंत्र्यांपासून सर्वच दिग्गजांनी त्यांच्या पाठीशी ताकद उभी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विक्रमी मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न
तुरळक ठिकाणीच मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले, अन्यथा फारशी गर्दी नसल्याने मतदान वेगाने होऊन मतदार घरी निघून जात होते. सुनेत्रा पवार यांना देशात विक्रमी मताधिक्य मिळविण्याच्या जिद्दीने बारामतीत राष्ट्रवादीने प्रयत्न केले होते, त्यामुळे आता येत्या ४ मे रोजी हा विक्रम मोडला जातो का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.
पवार कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, रणजित पवार, शुभांगी पवार, जय पवार, रेवती सुळे या पवार कुटुंबीयांनी बारामतीतील विविध मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला.
14915,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.