कामगार विमा रुग्णालयासाठी शिंदे गावच्या जागेचा प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार विमा रुग्णालयासाठी 
शिंदे गावच्या जागेचा प्रस्ताव
कामगार विमा रुग्णालयासाठी शिंदे गावच्या जागेचा प्रस्ताव

कामगार विमा रुग्णालयासाठी शिंदे गावच्या जागेचा प्रस्ताव

sakal_logo
By

चाकण, ता. ५ : येथील औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसी टप्पा क्र.२ मधील शिंदे (ता. खेड) गावातील ‘एएन २४’ या सुविधा क्षेत्राच्या १० एकर जागेत कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव ईएसआयसीच्या पुणे विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर केला असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
चाकण औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा ‘ईएसआय’ची रक्कम कपात केली जाते. मात्र, त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पुणे अथवा पिंपरी चिंचवड शहरात जावे लागत होते. त्यामुळे कामगारांना होणारा त्रास टाळण्यासाठी व तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी चाकण एमआयडीसीत कामगार विमा रुग्णालय उभारण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय श्रम मंत्रालयाकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांनी गतवर्षीच्या जून महिन्यात झालेल्या ईएसआयसीच्या बैठकीत चाकण येथे १०० बेडचे रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली होती.
चाकण एमआयडीसीतील या कामगार विमा रुग्णालयाची उभारणी लवकर व्हावी, यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार ईएसआयसीच्या पुणे विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी चाकण एमआयडीसी टप्पा क्र.२ मधील शिंदे गावातील ‘एएन-२४’ या सुविधा क्षेत्राच्या १० एकर जागेचा प्रस्ताव मान्यतेसाठी ईएसआय कॉर्पोरेशनकडे पाठवला आहे.

एमआयडीसीतील लाखो कर्मचाऱ्यांसाठी कामगार विमा रुग्णालय उभारणे, ही काळाची गरज होती. अनेक कामगार संघटना, कंपनी प्रतिनिधी आदींनी वेळोवेळी ही मागणी केली होती. त्यावेळी चाकणला कामगार विमा रुग्णालय होण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतो आहे. त्यामुळेच रुग्णालयाच्या उभारणीच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे पडत आहे. जागेच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल, अशी अपेक्षा असून, रुग्णालय उभारणी पूर्ण होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार