महाळुंगे एमआयडीसी आता पोलीस ठाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाळुंगे एमआयडीसी आता पोलीस ठाणे
महाळुंगे एमआयडीसी आता पोलीस ठाणे

महाळुंगे एमआयडीसी आता पोलीस ठाणे

sakal_logo
By

चाकण, ता. १८ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चाकण पोलिस ठाणे अंकित महाळुंगे पोलीस चौकीचे महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याबाबतचे राजपत्रक राज्य सरकारकडून प्रसिद्ध केले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त कार्यालयाने दिली.
शासनाच्या आदेशानुसार महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत ४८ गावांचा समावेश केला आहे. याबद्दलची गाव निश्चितीही राजपत्रातून प्रसिद्ध केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण ४८ गावांचा समावेश केला आहे; तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फक्त २३ गावांचा समावेश केला आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी ५३ गावे होती. चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीस गावे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला जोडण्यात आलेली आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण औद्योगिक वसाहत व ग्रामीण भाग मोठा आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाळुंगे पोलीस ठाणे मोठे आहे. महाळुंगे पोलीस ठाण्याची हद्द वाढविल्याने महाळुंगे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संख्याही त्या प्रमाणात वाढणार आहे.
आमदार मोहिते यांचा विरोध
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत ४८ गावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत, ती चुकीची आहेत. औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असणे गरजेचे आहे. औद्योगिक वसाहतीतील गावासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे हे वासुली फाटा या परिसरात असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील पाईट पोलीस चौकीची जी गावे पाईटसह महाळुंगे पोलीस ठाण्याला जोडलेली आहेत, ती चुकीची आहेत. पाईट पोलीस चौकी स्वतंत्र असणे महत्त्वाचे आहे. औद्योगिक वसाहतीत चाकण पोलीस ठाणे, महाळुंगे पोलीस ठाणे, पाईट पोलीस ठाणे, अशी पोलीस ठाणे स्वतंत्र होणे गरजेचे आहे. चाकण पोलीस ठाण्याला जवळ असणारी कुरुळी व खराबवाडी ही गावे महाळुंगे पोलीस ठाण्याला चुकीच्या पद्धतीने जोडलेली आहेत. शासनाने जो आदेश काढलेला आहे, याबाबत उपमुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे. नागरिकांच्या सेवा व सुविधेसाठी पोलीस ठाणे जवळ असणे गरजेचे आहे. आडवळणी पोलीस ठाणे असणे चुकीचे आहे. पोलीस ठाण्याला जी गावे जवळ आहेत, तीच गावे त्या पोलीस ठाण्याला जोडली पाहिजेत, अशी माझी मागणी आहे. शासनाने काढलेला आदेश हा पूर्णपणे चुकीचा आहे. भौगोलिक सर्वे करून नागरिकांच्या मागणीचा विचार करून संबंधित पोलीस ठाणी निर्माण करावीत, असे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारी गावे : महाळुंगे, खराबवाडी, आंबेठाण, बोरदरा, भांबोली, वराळे, वासुली, कोरेगाव खुर्द, शिंदे, सावरदरी, खालुंब्रे, सांगुर्डी, येलवाडी, कान्हेवाडीतर्फे चाकण, मोई, निघोजे, कुरुळी (पुणे -नाशिक महामार्गाची पश्चिमेकडील बाजू) कुरकुंडी, तळवडे, आसखेड बुद्रुक, आसखेड खुर्द, शेलू, करंजविहीरे, धामणे, पाईट, कोळीये, वाकीतर्फे वाडा, शिवेगाव, वहागाव, देशमुखवाडी, वाघू, कान्हेवाडी खुर्द, पराळे, कोहिंडे खुर्द, गडद, वेल्हावळे, रौधळवाडी, आखतुली, सुपे, आडगाव, पाळू, अनावळे, कासारी, टेकवडी, हेद्रुज, तोरणे बुद्रुक, आहिरे.