
महिलेचा पाठलाग, शिवीगाळप्रकरणी चौघांना अटक
चाकण, ता. १७ : महाळुंगे (ता. खेड) येथे आरोपींनी एका वीस वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिच्या खोलीच्या दरवाज्यावर हाताने मारून अर्वाच्य, अश्लील भाषेत तिला शिवीगाळ केली. तसेच घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महिलेने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर आरोपी विकास राकेश सरवदे (वय २५, रा. चिखली ता. हवेली), राजेश रामदास पाटोळे (वय -२८ रा. निगडी, ता. हवेली), ज्ञानेश्वर बाबूराव वैरागे (वय- ३६, रा. कृष्णानगर ता. हवेली), आकाश मोकिंद कांबळे (वय -२३, रा. रुपीनगर ता. हवेली) या आरोपींना अटक केल्याची माहिती महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकार १५ तारखेला रात्री दहाच्या सुमारास घडला. फिर्यादी महिला कामावरून घरी जात असताना चारचाकी गाडी नंबर (एम एच. ०५ ए जे ७४ १७) यामधील आरोपींनी तिचा पाठलाग केला. आरोपी पाठलाग करत असल्याचे फिर्यादी यांनी पाहिले. त्यावेळी त्यांनी घाबरून जोरात खोलीकडे जाऊन खोलीचा दरवाजा आतमधून बंद केला. आरोपींनी खोलीचा दरवाजा जोरजोरात वाजवला. यावेळी फिर्यादी यांनी आवाज देऊन विचारले कोण आहे?, तेव्हा आरोपी सरवदे याने मला तुझ्याशी बोलायचे आहे तू दरवाजा उघड असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी महिलेने मला तुझ्याशी बोलायचे नाही तू निघून जा असे सांगितले. यादरम्यान आरोपी सरवदे याने जोर जोरात दरवाजावर हाताने मारून अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ केली व घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी महिलेने पोलिस कॉन्स्टेबल लोखंडे यांना फोन करून कळविले. त्यांनी तत्काळ येऊन आरोपींना पकडले.