
चाकणमध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन
चाकण, ता. २७ : येथे पुणे-नाशिक महामार्गावरील एकता नगरजवळील पाणीपुरवठ्याच्या टाकीशेजारी नगर परिषदेच्या कर्मचारी महिलांना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शेतात बिबट्या दिसला. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना दिली आहे, असे चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ व उपमुख्याधिकारी राजेंद्र पांढरपट्टे यांनी दिली.
चाकण (ता. खेड) शहरातील मध्यवर्ती भागात बाजारपेठेजवळ १५ फेब्रुवारीला सकाळी बिबट्या घुसला होता. तो वनविभागाने जेरबंद केला होता. बिबट्या शहरात घुसल्याने भीतीचे वातावरण होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा सायंकाळी सहाच्या सुमारास चाकणला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या एकता नगरजवळील पाण्याच्या टाकीच्या शेजारी झुडपात बिबट्या नगरपरिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांना दिसला. त्यानंतर नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकाऱ्यांनी तो बिबट्या पाहिला.
याबाबत चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी योगेश महाजन यांनी सांगितले की, बिबट्याचे ठसे वन विभागाच्या वतीने घेण्यात आलेले आहेत. तो बिबट्या आहे. या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी तत्काळ पाठविले, तसेच या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे.
या परिसरात बिबट्या आल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी प्रशासनाला दिली. बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान बिबट्या चाकण शहराच्या अगदी जवळ आल्याने पुणे-नाशिक महामार्गावरील एकता नगर हा परिसर मोठ्या लोकवस्तीचा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या लवकर पकडावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.